पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. डोमनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठीसंबंधीची सुनावणी तिथल्या कोर्टात सुरू आहे. मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करा अशी मागणी डोमनिका सरकारने कोर्टात केली आहे. दरम्यान आजही कोर्टात डोमनिका सरकारतर्फे हीच मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग आज मोकळा होतो का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
गुरूवारी सकाळी डोमनिकाच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता या सुनावणीला सुरूवात होईल. मी डोमनिकामध्ये सुरक्षित नाही असं मेहुल चोक्सीने कोर्टाला सांगितलं. तसंच मला अँटीग्वाला पाठवा अशीही मागणी त्याने कोर्टात केली आहे.
गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक ट्रीपवर गेला होता मेहुल चोक्सी, Dominica मध्ये झाली अटक – अँटीग्वा पंतप्रधानांची माहिती
डोमनिका येथील कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर यासंबंधीची सुनावणी गुरूवारी घेतली जाईल असं सांगितलं. डोमनिकामध्ये अवैध प्रवेश केल्या प्रकरणी मेहुल चोक्सीला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं जाईल. मेहुल चोक्सीला डोमनिकामध्येच ठेवण्यात येईल की भारतात त्याचं प्रत्यार्पण करण्याचा निर्णय होईल हे आज समजू शकण्याची शक्यता आहे. याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान डोमनिका सरकारतर्फे कोर्टात हे सांगण्यात आलं आहे की त्याचं प्रत्यार्पण भारतात करण्यात यावं. आज तक मिळालेल्या माहितीनुसार मेहुल चोक्सीचा भाऊ चेतन हा डोमनिकामध्ये आहे. तसंच 29 मे रोजी मेहुलचा भाऊ चेतन डोमनिकाला पोहचला आहे. मेहुलच्या वतीने कोर्टात बाजू मांडणं, वकिलांशी संवाद साधणं हे सगळं त्याचा भाऊ चेतनच करतो आहे.
मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु, मराठमोळ्या IPS अधिकारी शारदा राऊत यांची टीम डोमनिकात दाखल
भारतातल्या पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले होते. 2018 मध्ये हे दोघे फरार झाले. त्यानंतर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. मात्र मेहुल चोक्सी हा अँटीग्वा मध्ये लपला होता. काही दिवसांपूर्वी तो डोमनिकाला आला तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावला आहे. या दोघांनीही बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने बँकेकडून वारंवार पैसे उचलले आणि ते परत केलेच नाहीत. या प्रकरणाचा कोणाताही लेखाजोखा नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. मात्र भारतात या प्रकरणावरून गदारोळ होण्यापूर्वीच मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांनीही देश सोडला होता.
अँटीग्वाचे पंतप्रधान ब्राऊन डोमनिकामधील सरकारी यंत्रणांशी संपर्कात असून मेहुल चोक्सी हा आर्थिक घोटाळ्यात फरार झालेला आरोपी असून त्याला अँटीग्वात आणण्याऐवजी भारतात पाठवण्यात यावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डोमनिकामध्ये मेहुल चोक्सीला मारहाण झाल्याचं प्रकरण स्थानिक हायकोर्टासमोर प्रलंबित आहे. २ जूनला यावर सुनावणी झाली ती आज पुन्हा होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT