Dr Prakash Amte news : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीच्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीत दोन महिन्यांनी सुधारणा झाली आहे अशी माहिती डॉ. अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे अनिकेत आमटे यांची फेसबुक पोस्ट?
गेले अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअपसाठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे.
आणखी काय म्हटलं आहे अनिकेत आमटे यांनी?
मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी अतिशय खडतर गेले. दोन महिने सलग ताप आणि न्युमोनियामुळे ९ किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो.
DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील. आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत. पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम.
आपला नम्र,
अनिकेत आमटे
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजासाठी आणि शेजारच्या मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात सामाजिक उपक्रम राबवला आहे. त्याची नोंद अनेकदा घेण्यात आली आहे. या सामाजिक कार्याबद्दल त्यांना मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात बिल गेट्स यांच्या हस्ते ICMR जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांनी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी ते शिकत असताना त्यांचा परिचय मंदाकिनी आमटेंसोबत झाला. त्यानंतर या दोघांचा विवाह झाला. मंदाकिनीही त्यांच्यासोबत या सामाजिक कार्यात सहभागी झाल्या.
बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा प्रकाश आमटे यांनी जपलाच नाही तर तो आणखी समृद्धही केला. प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ ला झाला. प्रकाश आमटे यांच्या आईचं नाव साधनाताई होतं. त्यांनीही बाबा आमटे यांच्या कार्याला वाहून घेतलं होतं.
बाबा आमटे यांनी त्यांचं आय़ुष्य कुष्ठरोग्यांसाठी वेचलं. बाबांचं कार्य प्रकाश आमटे यांनी लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे तेच संस्कार त्यांच्यावरही झाले. याच प्रकाश आमटे यांच्या आयुष्यावर एक सिनेमाही निघाला होता. ज्याचं नाव होतं प्रकाश बाबा आमटे. या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती.
ADVERTISEMENT