२१ जूनला महाराष्ट्रात झालेल्या बंडाची चर्चा अजूनही होते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडले. हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. महाराष्ट्रात असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आता २६ (शनिवार) एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांना घेऊन जाणार आहेत. या दौऱ्याबाबत शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीबाबत एक महत्त्वाची बाब सांगितली आहे.
ADVERTISEMENT
काय सांगितलं आहे शहाजीबापू पाटील यांनी?
आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला. त्यावेळी आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं. ती आमची वैचारिक लढाई होती. आम्ही ही लढाई जिंकावी म्हणून आम्ही कामाख्या देवीकडे प्रार्थना केली होती. त्यावेळी कामाख्या देवीचे पुजारी एकनाथ शिंदे यांना म्हणाले होते की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. हे भाकीत त्या पुजाऱ्यांनी सांगितलं असं शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यानंतर आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला येणार असल्याचं म्हटलं होतं. आम्ही आता नवस फेडण्यासाठी जात आहोत असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.
गुवाहाटीमध्ये आम्ही एकदा पती-पत्नी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. गेल्यावेळी परिवर्तन करण्यासाठी गेलो होतो यावेळी एकजुटीने विकास करण्याचा संकल्प करणार आहोत. कर्नाटकच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.. पण एक एकर जमीनही आम्ही सोडणार नाही. सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळेल असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
काय झाडी काय डोंगार या संवादामुळे प्रसिद्ध झाले आहेत शहाजीबापू
काय झाडी काय डोंगार काय हाटेल? या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील चांगलेच प्रसिद्ध झाले होते. शहाजीबापू पाटील यांचा हा डायलॉग सोशल मीडियावर खूप गाजला होता. तसंच त्यावर गाणंही तयार झालं होतं. आता याच शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे भविष्य कामाख्या देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याने सांगितलं होतं असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मिरगाव येथे भविष्य पाहिल्याची चर्चा
दोन दिवसांपूर्वी शिर्डी जवळच्या मिरगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य पाहिल्याची चर्चा होते आहे. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. आज त्यांनी या टीकेला उत्तरही दिलं आहे. मात्र भविष्य पाहिलं की नाही याचं स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. अशात आता कामाख्या देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होणार हे सांगितलं होतं असं शहाजीबापू यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT