बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेत 316 कोटी गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला असून, प्रशासकाच्या फिर्यादीवरुन शनिवारी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. रिझर्व्ह बँक आणि न्यायालयानेही आदेश दिलेले असताना गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं होतं. अखेर ठाण मांडून बसल्यानंतर पाच तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
सारडा यांनी बँकेत मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र कधी राजकीय पक्षाच्या माध्यमातून सारडा हे कारवाईतून सुटका करत असल्याचं बोललं जात होतं. तीन ते चार महिन्यांपूर्वी सारडा यांनी बँकेचा पैसा वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला तसेच अनेक गैरव्यवहार केल्याचे समोर आले असल्याची चर्चा होती.
मंत्री बँकेतील 316 कोटी रुपयांचे गैरव्यवहार प्रकरण आता बँकेचे संस्थापक सुभाष सारडा यांना चांगलेच भोवले आहे. 316 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सुभाष सारडासह संचालक मंडळावर शनिवारी (18 डिसेंबर) सायंकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेसह न्यायलयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना देखील गुन्हे नोंद होण्यास विलंब होत होता. संस्थापक सुभाष सारडा, 23 संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, 4 शाखा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा एकूण 29 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि.नं.454/2021 कलम 420,477 (अ), 34 भादवी नुसार) दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके करत आहेत.
रिझर्व्ह बँकेसह न्यायालयानेही दिले आदेश
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून कुप्रसिद्ध झालेल्या बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेसह न्यायालयाने दिल्यानंतरही बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. द्वारकादास मंत्री बँकेवर नेमलेले प्रशासक अशोक कदम आणि चाळक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या दोषी संचालक मंडळासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. शेवटी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT