शिवसेना खासदार भावना गवळी आणि त्यांच्या संस्थांनी बँकांची फसवणूक केली. भावना गवळींवर करण्यात आलेली कारवाई ही सुरूवात आहे. यापुढे CBI, इन्कम टॅक्स, RBI अशा सगळ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळेच ईडीने छापेमारी केली आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले किरीट सोमय्या?
भावना गवळी यांनी 55 कोटी रुपयांचा कारखाना त्यांच्याच बेनामी कंपनीला अवघ्या 25 लाखाला दिला. मुख्यमंत्री कार्यालय यांच्या दबावाखाली फक्त एफआयआर केली. भावना गवळी यांच्या कार्यलयातून 60 कोटी रुपये चोरीला गेले. एवढे पैसे आले कुठून भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले. भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे बाकी इतर संस्थांच्या कारवाई होणार आहे, असं ते म्हणाले.
भावना गवळी यवतमाळच्या खासदार असून, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडीकडे तक्रार करण्यात आलेली होती. त्यानंतर आज ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात घरं, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
भावना गवळी यांच्या कार्यालयांसह सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली जात आहे. यात यवतमाळ येथील भावना गवळी यांचं कार्यालय, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे असलेल्या उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्याचं समजतंय.
किरीट सोमय्यांची तक्रार काय होती?
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आरोप केलेले आहेत. खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केलेला होता.
भावना गवळी यांनी माफियागिरी चालवली आहे. भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रार दिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींत उभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला. त्यामुळे भावना गवळींच्या संस्थांवर धाडी पडल्या आहेत. या कारवाईचं मी स्वागत करतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT