राज्यात आगामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात यंदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत मध्यंतरीच्या काळात विचार सुरु होता. परंतू यंदाची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. १२ ते २८ एप्रिल दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा पार पडणार आहेत, तर २९ एप्रिल ते २० मे या काळात लेखी परीक्षा पार पडणार आहेत. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल आणि लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत.
ADVERTISEMENT
या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे. एरवी दहावी-बारावीच्या परीक्षा या सकाळी ११ वाजता सुरु होतात परंतू यंदाच्या वर्षी या परीक्षा साडे दहा वाजल्यापासून सुरु होणार आहेत. लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्यामुळे यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. याचसोबत ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनीटं वेळ वाढवून देण्यात आली आहे.
कोरोना काळात मुलांना प्रवास करावा लागू नये यासाठी त्यांच्यात शाळेत त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. जर एखाद्या शाळेत मुलांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नसेल तर त्या मुलांची जवळील शाळेत सोय करण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व पेपरसाठी १ तास वाढवून देण्यात आला आहे, तर प्रॅक्टीकलच्या परीक्षा या गृहपाठ पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोना काळात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे…यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असं आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिलंय.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ५ ते ६ प्रॅक्टीकलच्या आधारावरच घेतली जाणार आहे. आर्ट्स आणि कॉमर्स शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत Assignment सादर करावं लागणार आहे. दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं घर कन्टेन्मेंट झोनमध्ये असेल तर त्यांना आपली Assignment सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
याचसोबत एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेदरम्यान कोरोनाची लागण झाली किंवा परीक्षेदरम्यान त्याच्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली तर त्याची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल. याचसोबत कन्टेन्मेंट झोन मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जर परीक्षा देणं शक्य होणार नसेल तर त्यांची परीक्षाही जून महिन्यात घेतली जाईल.
ADVERTISEMENT