एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर, चौकशीमागे राजकीय वास येत असल्याची प्रतिक्रीया

सौरभ वक्तानिया

• 05:53 AM • 08 Jul 2021

भोसरी येथील MIDC भूखंड जमीन खरेदी प्रकरणात अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. यानंतर स्वतः एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना काल समन्स बजावलं होतं. एकनाथ खडसे आज पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होते, परंतू तब्येतीचं कारण देऊन ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. […]

Mumbaitak
follow google news

भोसरी येथील MIDC भूखंड जमीन खरेदी प्रकरणात अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. यानंतर स्वतः एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना काल समन्स बजावलं होतं. एकनाथ खडसे आज पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होते, परंतू तब्येतीचं कारण देऊन ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ईडी कार्यालयात हजर होण्याआधी माध्यमांशी बोलत असताना एकनाथ खडसेंनी या चौकशीमागे राजकीय वास येत असल्याचं म्हटलं आहे. “मी आतापर्यंत ईडीला सहकार्य करत आलो आहे आणि यापुढेही करेन. ते आज जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तर मी देईन. मुळात ज्या भूखंडाच्या खरेदीवरुन ही चौकशी सुरु आहे, तो भूखंडच वादग्रस्त आहे. हा भूखंड MIDC चा असल्याचं बोललं जातं, परंतू आजपर्यंत त्या भूखंडाचा ताबा MIDC कडे नाही. भूसंपादनाची प्रक्रीया, मोबदला अजुनही MIDC ने दिलेला नाही. ज्यावेळी ही जमीन खरेदी करण्यात आली त्यावेळी तिकडे मूळ मालकाचं नाव होतं.”

“१९७१साली निघालेल्या एका नोटिफिकेशनचा आधार घेत हा भूखंड MIDC आहे असं बोललं जातंय. पण आतापर्यंत ५ वेळा या प्रकरणाची चौकशी झाली. अँटी करप्शन, बंडगार्डन पोलीस. झोटींग समिती, इन्कम टॅक्सने या प्रकरणाची चौकशी केली. अँटी करप्शनने माझ्यावरील आरोपांमध्ये तथ्य नाही असा रिपोर्ट पुणे कोर्टात सादर केला. मुळात हा खासगी व्यवहार आहे. पण मी भाजप सोडून राष्ट्रवादीच आल्यानंतर या चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यामागे मला राजकीय वास येत आहे”, असं खडसे म्हणाले.

या चौकशीच्या हेतूबद्दल माझ्या मनात शंका आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये Whats App ग्रूपवर विविध चर्चा सुरु आहेत. काहीही करुन नाथाभाऊंना यात अडकवायचं असे प्रयत्न सुरु आहेत. मुळात हा व्यवहार मी नाही तर माझ्या पत्नी आणि जावयाने केला आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी मी सक्षम असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलं. दरम्यान खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले असले तरीही त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे. ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावं यासाठी खडसेंनी मध्यंतरी हायकोर्टात धाव घेतली होती. हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित असल्यामुळे सध्या ईडी खडसेंवर अटकेची कारवाई करण्याची शक्यता कमी आहे.

    follow whatsapp