जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे. दोघे एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. अनेकदा गिरीश महाजन हे भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंना घेरण्याचा प्रयत्न करतात. रविवारी भाजप आमदार गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी थेट संजय राऊत यांच्यानंतर एकनाथ खडसेच आहेत, असे सांगून टाकले. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
ADVERTISEMENT
भाजप सत्तेत आले आहे. तेव्हा मला क्लीन चिट देऊन सुद्धा हे सरकार माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता.
गिरीश महाजन एकनाथ खडसेंबद्दल काय म्हणाले?
याच मुद्द्यावर भाजप आमदार गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यावर अजिबात दबाव आणला जात नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेल्या आरोपाचे खंडन केले. खडसे यांचे जावई गेल्या एक वर्षांपासून जेलमध्ये आहेत. ते विनाकारण घरूनच अडकलेत, असं मला वाटतं. कोर्टाने खडसेंना क्लीन चिट दिलेली नाही, असं देखील महाजनांनी स्पष्ट केलं.
ज्या झोटिंग अहवालाचा दाखला खडसे देत आहेत तो सगळा समोर आहे. तुम्ही म्हणतच असाल तर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून तो अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवायला सांगेन, असं महाजन म्हणाले. झोटिंग अहवालात सर्व स्पष्ट आहे, म्हणून तुम्हाला क्लीनचीट मिळालेली नाही. तसे असते तर तुमच्या जावयाला अटक झाली नसती, असं देखील एकनाथ खडसे यांना उद्देशून गिरीश महाजन म्हणाले. त्यांच्या विरोधातील तक्रारी ह्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत. मात्र गेल्या काळात त्यांचं सरकार असल्याने या तक्रारी दाबल्या गेल्या होत्या. आता चौकशीत स्पष्टता येईल व कोण स्वच्छ आहे व कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
या राज्यामध्ये तुम्ही दुसरे संजय राऊत आहात, असं म्हणत एक गर्भित इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. तुम्हाला ईडी किंवा इतर एजन्सीमार्फत जी विचारणा होते, जी स्पष्टता मागितली जाते ती आपण द्यावी, असं देखील गिरीश महाजन म्हणाले. आता दुसरे संजय राऊत असं जो गिरीश महाजन म्हणालेत, त्याचा नेमका अर्थ काय? संजय राऊत यांच्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या चिंता वाढतील का? हे येणाऱ्या काळात समजून येईल.
ADVERTISEMENT