गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारभोवती वेगवेगळे वाद घोंगावत आहेत. महापुरुषांबद्दलची वादग्रस्त विधानांपासून सुरू झालेली वादाची मालिका आता साहित्य क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचल्याचं स्थिती राज्यात दिसत आहे. फॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच आता वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बदललण्यात आल्याचा मुद्द्यावरून वाद उभा राहिला आहे.
ADVERTISEMENT
96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आलीये. पण, अध्यक्षपदाच्या निवडीत सरकारने हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनीच केलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास निश्चित झालेली होती, मात्र सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे त्यांची निवड रोखली गेली आणि चपळगावर यांची निवड करण्यात आल्याचा आरोप थेट सरकारवर करण्यात आलाय.
सुरेश द्वादशीवर यांची अध्यक्षपदी निवड रोखल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास निश्चित झालेली होती. परंतु त्यांचं भाषण काहींना अडचणीत आणणारं ठरेल, या भीतीने सरकारमधील काही घटकांनी संयोजकांवर दबाव आणून त्यांची निवड रोखली.”
पुढे बोलताना अजित पवार म्हणतात, “हे कशाचं द्योतक आहे. बोलू द्या ना. प्रत्येकाला आपली मतं मांडू द्या ना? संविधानाने ते सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं. ती आपली परंपरा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. विचारांची लढाई विचारांनी करा ना… कुणी अडवलंय? आमच्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही अध्यक्षपदही घेऊ देणार नाही. तिथे लुडबूड तुम्हाला कुणी करायला सांगितली. हे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतंय,” असा ठपका अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ठेवला आहे.
लेखिका प्रज्ञा दया पवारांचंही सरकारकडे बोट
प्रज्ञा दया पवार म्हणाल्या, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपल्याला माहितीच आहे. सुरेश द्वादशीवारांसारखे वैचारिक लेखन करणारे मोठे लेखक आहेत. त्यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं होतं. ते मागे घेण्यात आलं. नरेंद्र चपळगावकरांबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण हे जे होतं सुरेश द्वादशीवार हे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आल्यानंतर काय बोलतील? काय भूमिका घेतली? ती भूमिका सोयीचे नसेल, सोयीची सोडून द्या, पण वास्तव मांडायचं की नाही?”
प्रज्ञा दया पवारांनी पुढे असं म्हटलंय की, “सुरेश द्वादशीवार हे काय नक्षलवादाचे समर्थक आहेत का? त्यांच्यावर काही नक्षलवादाचा आरोप झालेला आहे का? मला हेच म्हणायचं आहे की कोबाद गांधी असो किंवा सुरेश द्वादशीवार, तुम्ही सगळ्यांनाच एका रंगात रंगवणार असाल, तर हे फार चुकीचं आहे” अशा शब्दात प्रज्ञा पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलच्या मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे.
सुरेश द्वादशीवार यांचं नाव संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. तसं साहित्यिक वर्तुळातून सांगितलं जात होतं. मात्र, याबद्दल निवडीमध्ये हस्तक्षेप करण्यात आलाय. या प्रकरणावर अद्याप सरकारडकून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT