मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले. ते ठाकरेंचे खास अधिकारी असल्याचाही आरोप भाजपकडून केला जात असताना शिंदेंनी चहल यांचं कौतुक केलं. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल?
ADVERTISEMENT
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “मी मोदींचा आभारी आहे की, महाराष्ट्रातील चार शहरात जी20 समीट होत आहे. मुंबईत झाली. पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये होईल. जगभरातील लोक मुंबईत आले होते. ते इतके खूश झाले.”
“मी बीएमसी आयुक्त इक्बालसिंग चहल यांचे आभार मानतो. त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांनी मुंबईला चमकावून टाकलं. मग लोकांच्या पोटात त्रास सुरू झाला. 15-20 वर्ष तुम्हाला संधी होती. तुम्ही केलं नाही, आम्ही सहा महिन्यात केलं. आता चांगलं तरी म्हणा”, असं शिंदे म्हणाले.
“मुंबईत जे 20-25 वर्षात झालं नाही, ते आता होतंय. लोकांना बदल दिसतोय. आम्ही विकासाबरोबर पुनर्विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असंही शिंदे म्हणाले.
“तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांत महापालिकेच्या निवडणुका होतील, तेव्हा विकासाचं हे डबल इंजिन, त्यांचं ट्रिपल इंजिनमध्ये रुपांतर होईल एवढंच सांगतो”, असं म्हणत शिंदेंनी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
सोमय्यांनी इक्बालसिंग यांच्यावर काय केले आहेत आरोप?
“मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे मातोश्रीचे आयुक्त आहेत की, मुंबई महापालिकेचे हे अजूनपर्यंत समजलेले नाही. संजय राऊत त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. अस्तित्वात नसलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी 5-5 कोविड सेंटर्सचे 100 कोटींचे कंत्राट दिले. मी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र मुंबई पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्लाब चहल यांनी 140 दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिलेले नाहीत”, असा आरोप सोमय्यांनी केलेला आहे.
ADVERTISEMENT