शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिलं जातं आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं असून ते २६ ते २७ आमदारांसह सुरतमध्ये आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे आणि त्यांनी २६ पेक्षा जास्त आमदारांना आपल्याला सोबत नेलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे मंत्री तसंच महत्त्वाचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे तो शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. असं असलं तरीही शिवसेनेत बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक दिग्गजांनी शिवसेना सोडली आहे. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आमदारही फोडले होते.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना का म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’
छगन भुजबळ हे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले पहिले नेते आहेत. १९९१ मध्ये आठ आमदारांना सोबत घेत छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले होते.
१९९१ ला बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत छगन भुजबळ यांचे मतभेद झाले आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. सुरूवातीला ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. ज्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मार्मिक या साप्ताहिकात व्यंगचित्र काढतही छगन भुजबळ यांचा समाचार घेण्यात आला.
गद्दार म्हणत त्यांच्यावर शिवसैनिकांनी आगपाखड केली होती. तसंच बाळासाहेब ठाकरे हेदेखील छगन भुजबळ यांचा उल्लेख लखोबा लोखंडे असा करत होते. शरद पवारांनी काँग्रेसमधून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री होते. तसंच आत्ताच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही त्यांच्यावर अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलं आहे.
‘साजिशे लाखो बनतीं हैं…’ निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
नारायण राणे हे शिवसेनेतले दुसरे दिग्गज नेते आहेत ज्यांनी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच जय महाराष्ट्र केला होता. उद्धव ठाकरे तसंच त्यांच्या काही सहकारी लोकांना विरोध करत नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला धोक्यात असल्याची चर्चा झाली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी षणमुखानंद हॉलमध्ये एक मोठी सभा घेतली. त्यामध्ये नारायण राणे यांच्याविरोधात जे भाषण केलं ते आजही यु ट्यूबवर पाहिलं जातं.
नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदही दिलं होतं. त्या सगळ्याचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला होता. नारायण राणे हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर आता भाजपमध्ये गेले असून त्यांना केंद्रीय मंत्रीपदही देण्यात आलं आहे. नारायण राणे यांचा उल्लेख कायम बाळासाहेब ठाकरेंनी नारोबा, नागोबा असाही केला होता. तसंच शिवसैनिकांकडून त्यांना गद्दार असंही संबोधलं गेलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणेंचा उल्लेख बाटगे असा केला होता. तसंच नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आजही कायम आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे सोडत नाहीत.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे- नारायण राणे
छगन भुजबळ,नारायण राणे या दोन दिग्गजांनंतर शिवसेना सोडणारे तिसरे दिग्गज नेते आहेत राज ठाकरे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. मात्र पक्षात सातत्याने डावललं जात असल्याने नाराज होऊन २००५ मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली.
२७ नोव्हेंबर २००५ हा दिवस असा होता ज्या दिवशी राज ठाकरे हे पहिले ठाकरे होते ज्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे विरूद्ध राज ठाकरे असा सामनाही रंगला होता. बाळासाहेब ठाकरेंना राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याचा त्रास होत होताच. त्यांनी तो एका मुलाखतीत बोलूनही दाखवला होता. तर राज ठाकरे यांनी सुरूवातीला नाव न घेता आणि त्यानंतर नाव घेऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला. मराठी भाषेचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा, पोलिसांसाठीचं आंदोलन, रझा अकादमीविरोधातला मोर्चा, टोल विरोधातला मोर्चा असे अनेक मुद्दे त्यांनी गाजवले. मात्र २०१४ नंतर मनसेला उतरती कळा लागली. आता गेल्या तीन महिन्यांपासून राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत कारण त्यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा बाहेर काढला. आता एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचा संस्कार आमच्यावर झाला आहे असं ट्विट त्यांनी काही वेळापूर्वीच केलं होतं.
ADVERTISEMENT