मुंबई: दसरा मेळाव्यावरून ठाकरे-शिंदे आमनेसामने आले आहेत. याअगोदरच शिवाजी पार्कवर दोघांनीही दावा ठोकला आहे. पण मैदान मारलं एकनाथ शिंदेंनी. शिवाजी पार्कवरच अडून बसलेल्या ठाकरेंनी शेवटच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली. पण तिथेच ठाकरेंना पहिला झटका बसला. मागून येऊन शिंदेंची जागा फिक्स झाली. पण दसरा मेळाव्याचा वारसा चालवणाऱ्या ठाकरेंना अजून वेटिंगवरच राहावं लागतंय. नेमकं झालं काय, शिंदेंनी मैदान कसं मारलं, ठाकरेंची स्ट्रॅटेजी कुठे चुकली आणि पुढचा मार्ग काय ते जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मोठा इतिहास
शिवसेनेमध्ये फाटाफुटी झालेली असताना यंदाचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा होतोय. बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेची नवी ओळख निर्माण करून दिली. आता त्याच प्रथेवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही दावा ठोकला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा होणार याबद्दल आरोप प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहे.
दोघांपैकी एकाला शिवाजीपार्क मिळणार, मग दुसऱ्याचं काय? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून राबवलेली शिंदे गटाची स्ट्रॅटेजी यशस्वी होताना दिसतेय. शिंदे गटानं शिवाजी पार्कसोबतच ५ ऑक्टोबरला बीकेसी मैदानावरही दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. बीकेसीवर पहिला दावा शिंदेंनी केला. नंतर ठाकरे आले. तर शिवाजी पार्कवर ठाकरेंनी पहिला दावा ठोकला आहे.
एकनाथ शिंदेंनी ‘फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरंस’नं मारली बाजी
‘फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरंस’ या न्यायानं शिंदेंनी बीकेसीचं मैदान मिळालं आहे. पण शिंदेंआधी दावा करूनही ठाकरेंनी अजून शिवाजी पार्क मिळालं नाही. शिंदेंना ज्या निकषानं बीकेसीचं मैदान मिळालं, तोच न्याय शिवाजी पार्कसाठी ठाकरेंनाही लावण्याची मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. पण कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव शिवाजी पार्कवर कुणालाच परवानगी न देण्याची तयारीही महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचं म्हटलं जातंय.
त्यामुळेच सत्तांतरानंतर बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन स्ट्रॅटेजी न राबवण्याचा झटका ठाकरेंना बसल्याचं म्हटलं जातंय. शिवाजी पार्कसोबतच बीकेसीवरही एकाचवेळी दावा ठोकला असता, तर अशी कोंडी निर्माण झाली नसती. खरंच ठाकरेंची स्ट्रॅटेजी चुकली का, शिंदेंना बीकेसीपाठोपाठ शिवाजी पार्कही मिळेल का? याचं उत्तर आगामी काळात मिळेल
ADVERTISEMENT