शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचं कोल्हापुरात आंदोलन सुरु आहे. परंतू अद्याप या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. यातूनच सांगली येथील कसबे डिग्रज येथे महावितरणचं कार्यालय पेटवून देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
रविवारी रात्री हा प्रकार घडला असून सरकारने राजू शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हा उद्रेक आणखी वाढत जाईल असा इशारा स्वाभिमानीने दिला आहे. गेल्या सात दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या या आणि अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – शेट्टींचा सरकारला घरचा आहेर
राजु शेट्टींच्या या आंदोलनाला कोल्हापूर आणि सांगली भागात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूनही अद्याप या विषयावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं स्वाभिमानीचं म्हणणं आहे.
याच संतापातून कसबे डिग्रज भागात महावितरणचं कार्यालय पेटवून देण्यात आलं आहे. या आगीत महावितरणच्या कार्यालयातील सर्व कागदपत्र आणि अन्य साहीत्य जळून खाक झालं आहे. अग्नीशमदन दलाने रात्रीपासून कामाला सुरुवात केल्यानंतर सकाळी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं. उर्जा मंत्र्यांनी जर या प्रकरणात वेळेतच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात या आंदोलनाची धग वाढत जाईल असा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.
ADVERTISEMENT