गरज नसेल तर युक्रेन सोडा आणि इतर विद्यार्थ्यांनी दुतावासाच्या संपर्कात राहा असे आदेश तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. यासंदर्भातलं एक पत्रच जाहीर करण्यात आलं आहे. युक्रेनवर रशिया हल्ला करू शकतं अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र जारी करण्यात आलं आहे. अत्यंत आवश्यक असेल त्या विद्यार्थ्यांनीच युक्रेनमध्ये रहावं ज्यांना इथे फार काम नाही त्यांनी तातडीने देश सोडावा असं सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
शिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची चिन्हं दिसत आहेत. युक्रेनच्या सीमेवर रशियाने 1 लाख 30 हजार सैनिक तैनात केले आहेत. तसंच रशियाचे टँक,लढाऊ विमानं, मोठा शस्त्रसाठा आणि मिसाईल्स हे सगळंही तैनात करण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेराव घातला आहे. युक्रेनचे प्रेसिडंट व्लादिमिर झेलेन्स्की यांनीही रशिया आमच्यावर 16 फेब्रुवारीला हल्ला करणार असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचं ट्विट केलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमेरिका आणि युरोपीय देशांतर्फे रशियावर प्रतिबंध लादले जातील असा इशारा दिलाय. मात्र रशियाला याने काहीही फरक पडलेला नाही. रविवारी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रूसचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. तसंच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांच्याशीही बायडेन यांनी चर्चा केली होती.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्याच आठवड्यात युक्रेनच्या सीमेवर 1 लाख 30 हजार सैनिक रशियाने तैनात केले आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. १ लाख ३० हजार सैनिकांपैकी 1 लाख 12 हजार सैनिक हे लष्कराचे आहेत तर 18 हजार सैनिक हे वायुदल आणि नौदलाचे आहेत. रशियाने युद्धाची पूर्ण तयारी केली आहे असंही बोललं जातं आहे.
अशा सगळ्या बातम्या समोर आलेल्या असतानाच CNN ने हे वृत्तही दिलं आहे की रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेराव घातला आहे. दक्षिण क्रिमिया आणि उत्तर बेलारूसच्या बाजूनेही हा घेराव घालण्यात आला आहे. अमेरिकेतल्या एका रिपोर्टनुसार रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो.
काय आहे युक्रेन आणि रशियामधला वाद?
1991 ला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेन हा स्वतंत्र देश झाला. युक्रेन हा युरोपमधला दुसरा मोठा देश ठरला आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन आहे. तसंच या देशातल्या उद्योग व्यवसायही भरभराटीला आलेला आहे. युक्रेनच्या पश्चिमी भागात आपल्या देशाबाबत जबरदस्त अभिमान आहे. तर युक्रेनमध्ये रशियन बोलणारे लोक अल्पसंख्याक गटात मोडतात. मात्र त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
2014 मध्ये रशियाला झुकतं माप देणारे युक्रेनचे राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात युक्रेन सरकारमध्ये बंडाळी माजली होती. रशियाने नेमकी हीच संधी साधली. त्यानंतर रशियाने क्रिमियावर कब्जाही केला होता. हा संघर्ष बराच काळ चालला. व्हिक्टर यांना जनआंदोलनांपुढे आणि संघर्षापुढे हार पत्करावी लागली. मात्र तोपर्यंत रशियाने क्रिमियाला तोपर्यंत आपल्या देशात विलिन करून घेतलं होतं. या घटनेनंतर युक्रेन पश्चिमी युरोपसह आपले संबंध चांगले कसे होतील याचे प्रयत्न करत आहे. मात्र रशिया याचा सातत्याने विरोध करतो आहे. त्यामुळेच युक्रेन रशिया आणि पश्चिम युरोपमधील देशांच्या संघर्षात अडकला आहे. आता हा संघर्ष इतका टीपेला गेलाय की रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
ADVERTISEMENT