राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केंद्रातील भाजप सरकारबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पुढील तीन दशकं भाजप हाच केंद्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
“भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार आहे, मग ते निवडणूक जिंकू देत किंवा हरू देत. ज्याप्रमाणे काँग्रेसच्या पहिल्या ४० वर्षांच्या काळात झालं आताही तसंच होईल. भाजप कुठेही जाणार नाही, ज्यावेळी तुम्ही देशपातळीवर ३० टक्के मत मिळवता त्यावेळी एक पक्ष म्हणून तुम्हाला सहज दूर करता येणं शक्य नसतं”, किशोर यांनी आपलं मत मांडलं.
त्यामुळे जनता सध्या मोदींवर नाराज आहे आणि ती सरकारला बाजूला करेल या भ्रमात राहू नका. कदाचीत जनता मोदींना बाहेर करेल पण भाजप कुठेही जाणार नाही. पुढची काही दशकं भाजपसोबत लढा असाच सुरु ठेवावा लागणार आहे, असं म्हणत प्रशांत किशोर यांनी आगामी गोवा विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं सांगितलं.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढील काही दिवसांमध्ये जनता नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर करेल असं वक्तव्य केलं होतं. परंतू राहुल गांधींनी असा विचार करणं चुकीच असल्याचं मतही किशोर यांनी व्यक्त केलं. “राहुल गांधीचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना वाटतं जनता मोदींना सत्तेबाहेर करेल, पण असं होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीस्थानाचा विचार करुन रणनिती आखत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याविरुद्ध लढाईसाठी आव्हानही तयार करु शकणार नाही.” सध्या अनेक लोकं मोदींची बलस्थानं काय आहेत हे समजूनच घेत नसल्याचंही किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांनीच नरेंद्र मोदी यांच्या २०१४ सालच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि तामिळनाडूत DMK पक्षाला सत्तेत येण्यासाठी किशोर यांनी मोलाची मदत केली होती.
ADVERTISEMENT