टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला अखेरीस यश प्राप्त झालं. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. जर्मनीवर ५-४ ने मात करत भारताने हा इतिहास घडवला. या विजयानंतर सर्व देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. भारतीय क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर संघाचं कौतुक करतायत. राजकारणी खेळाडूंना शुभेच्छा देत आहे.
ADVERTISEMENT
या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट आपल्या नजरेत पडली असेल ती म्हणजे अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होताना हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचं सांगत आहेत. तुमच्यापैकी बरेच जणांना वाटत असेल की अरे मला तर लहानपणी हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असल्याचं सांगितलेलं.
पण थांबा तुम्हाला माहिती आहे का? हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. किंबुहना भारताला राष्ट्रीय खेळच नाही. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत ८ गोल्ड मेडल, १ सिल्वर मेडल आणि ३ ब्राँझ मेडल अशी घवघवीत कामगिरी असताना हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा का नाही? किंवा का भारतात एकही खेळ हा राष्ट्रीय खेळ मानला जात नाही? आज आपण या व्हिडीओत हेच समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
Raj Kundra Porn Case : पॉर्न पाहणं भारतात गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? समजून घ्या
आपल्यापैकी अनेकांना अगदी शाळेपासून ही बाब शिकवली गेली आहे की हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. पण २०१२ साली एका १० वर्षांच्या मुलीने टाकलेल्या RTI याचिकेमुळे ही बाब पहिल्यांदा प्रामुख्याने समोर आली. ऐश्वर्या पराशर या मुलीने त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडे याबद्दल RTI याचिका दाखल करत माहिती विचारली. PMO ने ही याचिका केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवली. या RTI ला उत्तर देताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलं की भारतात अद्याप अधिकृतरित्या कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्यात आलेला नाही.
राष्ट्रीय खेळ या शब्दांतच त्याचा अर्थ दडलेला आहे. एक असा खेळ जो संपूर्ण देशात वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत खेळला जातो. या खेळासाठी देशात चांगल्या सोयी-सुविधा असणं अपेक्षित असतं आणि हा खेळ जतन करण्यासाठी तो देश नेहमी प्रयत्नशील असतो. पण जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा दुर्दैवाने असं चित्र दिसत नाही. भारतीय हॉकीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त यश मिळवलं आहे यात काही वाद नाही.
पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेलं यश हा राष्ट्रीय खेळ ठरवण्यासाठीचा निकष होऊ शकत नाही, कारण भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीत १९८० नंतर कधीच सातत्य राहिलेलं नाही. या ४१ वर्षांच्या काळात भारताने काही महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या पण ऑलिम्पिकमध्ये त्यांची पाटी कोरीच राहिली होती.
Pegasus Phone Tapping : पेगॅससने फोन कसे होतात हॅक? समजून घ्या
यानंतर भारतात सर्वात महत्वाचा खेळ येतो तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि महाराष्ट्रापासून पार इशान्येकडील राज्यांपर्यंत पोहोचलेला खेळ आहे. पण खेळाची पॉप्युलारिटी हा निकष देखील राष्ट्रीय खेळाचा दर्जा देताना कामी येत नाही. भारत सोडून अनेक देशांनी क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे क्रिकेटलाही राष्ट्रीय खेळाचा दर्जा देणं शक्य नाहीये.
क्रिकेट आणि हॉकी हे दोन्ही खेळ खर्चिक आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी एक बॅट, बॉल, स्टम्प आणि सोबत काही खेळाडूंची गरज लागते. हॉकीसाठी एक स्टिक, बॉल आणि सिंथेटीक टर्फचं मैदान, ग्लव्ज, हेल्मेट असं साहित्य लागतं. भौगोलिक दृष्टीने किंवा इतरही काही कारणं असतील ज्यामुळे भारताचा विचार केला तर अनेक घटकांना खेळातली ही गुंतवणूक करणं जमत नाही. म्हणून हॉकी या खेळात आपल्याला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, ओडीसा या राज्यांचं प्राबल्य दिसतं. पण इतर राज्यांमध्ये हॉकी हा खेळ फारसा रुजु शकला नाही.
समजून घ्या : महाराष्ट्रालाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका का?
फुटबॉल हा खेळ तुलनेने स्वस्त मानला जातो. तुमच्याकडे एक बॉल असेल तर मैदानात, रस्त्यात तुम्ही कुठेही हा खेळ खेळू शकता. पण दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय फुटबॉलची कामगिरी चांगली झालेली नाही. पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि इशान्येकडील काही राज्यांमध्ये आजही फुटबॉलचं क्लब कल्चर जिवंत आहे.
परंतू हे ठराविक प्रांत सोडले तर बाकीच्या भागांमध्ये फुटबॉलची कामगिरी ही यथातथाच राहिलेली आहे. १९५० साली भारतीय संघ फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरला होता, ज्यानंतर त्यांना कधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमावता आलं नाही. त्यामुळे फुटबॉललाही राष्ट्रीय खेळाचा दर्जा देणं शक्य नाही.
कुस्ती, कबड्डी हे आणखी काही खेळ भारतात प्रसिद्ध आहेत. परंतू या खेळांच्या बाबतीतही पुन्हा तोच मुद्दा येतो. कबड्डीने देशभरात आपले पाय रोवलेले असले तरीही उत्तरेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा या खेळावर दबदबा आहे. कुस्तीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र वगळता इतर भागांत हा खेळ पोहोचला नाही.
त्यामुळे भारतासारख्या विभिन्न संस्कृती असलेल्या देशात एका खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देणं खरंच कठीण आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार याबद्दल काही ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत विविध खेळांमधली भारताची कामगिरी साजरी करणं हेच प्रेक्षक म्हणून आपल्या हातात आहे.
ADVERTISEMENT