रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने युक्रेनमधून रशियाने सैन्य परत बोलवावं असा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे. अशात रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हला चारही बाजूने घेरलं आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाजवळ मिसाईल हल्ला करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
रशियाचं सैन्य आता आता युरोपच्या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या दिशेने पुढे चाललं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यात एक बांगलादेशी जहाजही सापडलं आहे. या ठिकाणी असलेल्या एका बांगलादेशी क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव Banglar Samriddhu आहे असंही समजतं आहे.
युक्रेनच्या राजधानीवर कब्जा करण्यासाठी आता रशिया प्रयत्न करताना दिसते आहे. रशियाने किव्हला चारही बाजूने घेराव घातला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाजवळच स्फोट झाले आहेत. युक्रेनची राजधानी किव्हवर बुधवारी रात्रीही हल्ले करण्यात आले. रशियन सैन्याने किव्हमध्ये मिसाईल हल्ला केला. किव्हमध्ये असलेल्या दक्षिण भागातील रेल्वे स्टेशनजवळ आणि संरक्षण मंत्रालयाजवळ मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किती नुकसान झालं आहे याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान तिथे युद्धाच्या धुमश्चक्रीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबवलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया आणि पोलंड या ठिकाणाहून आलेल्या नऊ विमानांतून सुमारे तीन हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप आणण्यात आलं आहे. लवकरच आणखी सहा विमानं भारताकडे प्रयाण करणार आहेत अशीही माहिती त्यांनी ट्विट करून दिली.
रशिया युक्रेन युद्ध अणुयुद्धाकडे वळतंय का?
बुधवारी काय घडलं?
खार्किव्ह हे युक्रेनमधलं एक मोठं शहर आहे. रशियन सैन्याकडून या शहरावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यूही झाला आहे. नवीन असं त्या विद्यार्थ्याचं नाव होतं तो कर्नाटकचा राहणारा होता. याआधी भारतीय दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अॅडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून एअरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगाही सुरू केलं आहे.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितलं आहे की आम्ही जेव्हा पहिली अॅडव्हायजरी लागू केली होती तेव्हा युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी होते. त्यापैकी आत्तापर्यंत 12 हजार विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे. आठ हजार विद्यार्थी खार्किव्ह आणि सूमीमध्ये आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिमी सीमेपर्यंत पोहचले आहेत किंवा त्या दिशेने जात आहेत.
ADVERTISEMENT