–स्मिता शिंदे, पुणे
ADVERTISEMENT
भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझं अशीच चुकीची समजूत कायम असल्याचं उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून समोर येतं. तर दुसरीकडे याच जुन्या विचारांना तिलांजली देत मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत केल्याचीही उदाहरण बघायला मिळातात. मुलीच्या जन्माच्या जंगी स्वागताची अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडलीये. मुलगी जन्माला आली म्हणून कुटुंबाने चक्क हेलिकॉप्टरमधून तिला घरी आणलं.
अलिकडच्या काळात अनेकांकडून मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. असाच एका मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात चर्चिला जात आहे. तालुक्यातील शेल पिंपळगांव येथील एका कुटुंबाने आपल्या नवजात मुलीला चक्कं हेलिकॉप्टरने घरी आणले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुलगी झाल्यानं आम्ही खूप आनंदी आहोत, अशा भावना मुलीच्या वडिलांनी व्यक्त केल्या. मुलीचे वडील विशाल झरेकर म्हणाले, “आमच्या कुटुंबात मुलगी नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचा गृहप्रवेश विशेष करण्याचा निर्णय घेतला आणि एक लाख रुपये खर्चून तिला घरी आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आमच्या घरात खूप काळानंतर मुलीचा जन्म झाला आहे.”
विशाल झरेकर यांच्या पत्नीने २२ जानेवारी रोजी भोसरी येथे (माहेरी) राजलक्ष्मी नावाच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर झरेकर यांनी मुलीला शेल पिंपळगाव येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं. मुलीचे वडील विशाल झरेकर (३० वर्षे) हे व्यवसायाने वकील आहेत.
‘मुंबई Tak’ शी बोलताना विशाल झरेकर म्हणाले, “मुलीचा जन्म हा सणासारखा साजरा व्हायला हवा. हा संदेश मला समाजाला द्यायचा आहे.” पुण्यातून मुलीला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलीचे स्वागत करण्यासाठी फुलांचा हार घालण्यात आला. आई आणि बाळाचं गुलाबाच्या पाकळ्या देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी हेलिकॉप्टर गावात दाखल होताच मुलीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT