कोरोना आणि लॉकडाउनच्या काळानंतर सोशल मीडियाच्या चांगल्या वाईट परिणामांबद्दलच्या चर्चा रंगलेल्या असताना सोशल मीडियामुळे लातूर जिल्ह्यात एक चांगली घटना घडली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यात असलेल्या औसा तालुक्यात घडली असून, सोशल मीडियामुळे एक शेतकऱ्याला त्याची चोरीला गेलेली दीड लाखांची बैलजोडी परत मिळाली आहे.
ADVERTISEMENT
झालं असं की, लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील समदर्गा शिवारातील एका शेतकऱ्याची शेतात दावणीला बांधलेली बैलजोडी चोरीला गेल्याचा प्रकार ऐन विजयादशमीच्या पहाटे घडला होता. पण सोशल मिडियाच्या सतर्कतेमुळे ही लाख मोलाची बैलजोडी दुसऱ्या दिवशीच सापडली.
औसा तालुक्यातील समदर्गा येथील अल्पभूधारक शेतकरी सीताराम ढोक यांनी पाच-सहा महिन्यांपूर्वी 1 लाख 60 हजार किमतीला खिलार जातीची बैलजोडी घेतली. दरम्यान विजयादशमीच्या पुर्वसंध्येला त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील दावणीला बैलजोडी बांधली आणि घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १५ विजयादशमी दिवशी ते सकाळी शेताकडे गेले असता दावणीला बांधलेली बैलजोडी बेपत्ता असल्याचं दिसलं.
त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली पण बैलजोडीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्याचबरोबर बैलजोडी चोरीला गेल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. ही माहिती गाव व परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
त्यानंतर शनिवार (१६ ऑक्टोबर) यापैकी एक बैल औसा शहरातील एका कृषी केंद्राच्या समोर असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांना समजलं. ही माहिती कळताच संबंधित शेतकरी तिकडे निघाले होते. जात असतानाच औसा-भादा रस्त्यावर यापैकी एक बैल चालत येताना दिसून आला. एक बैल मिळून आल्यानंतर तातडीने त्यांनी औसा गाठून दुसराही बैल ताब्यात घेतला.
‘वास्तविक एकेकाळी हा परिसर जनावरं चोरीला जाण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध होता; परंतु गेल्या काहीं वर्षांपासून अशा घटना कमी झाल्या आहेत. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाख मोलाची बैलजोडी मिळू शकली, असं दत्ता ढोक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT