वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमकपणे चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
ADVERTISEMENT
“एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष कसून प्रयत्न करत आहेत. भंडाऱ्याला जे अग्नितांडव झाले तेव्हा १० नवजात जन्मलेल्या बाळांचा मृत्यू झाला. त्यांना न्याय देण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले नाहीत. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला द्यायला हवा” अशीही मागणी यावेळी चित्रा वाघ यांनी केली.
लगड यांच्यावरही टीका
सिनीयर पीआय लगड यांचा रगेलपणा मी आज पाहिला असंही वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. पूजा चव्हाणचं मृत्यू प्रकरण हे दाबून टाकण्यासाठीच ते प्रयत्न करत आहेत असं दिसून आलं. ज्या पद्धतीची मग्रुरी आणि रगेलपणाने ते आमच्याशी बोलत होते तेव्हा मला हे जाणवलं की असल्या पोलिसांमुळेच मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचं नाव खराब होतं आहे. मी माझ्या २०-२२ वर्षांच्या राजकीय, सामाजिक जीवनात असले पोलीस अधिकारी पाहिले नाहीत अशीही टीका चित्रा वाघ यांनी केली. लगड यांचा बाप कोण आहे? हेदेखील शोधणार आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप FIR दाखल करण्यात आलेली नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तरही लगड यांच्याकडे नाही.
पूजा चव्हाणसोबत राहणारे दोघेजण कुठे आहेत? त्यांना पुणे पोलिसांनी अद्याप ताब्यात का घेतलं नाही? पूजाचा मृत्यू झाल्यानंतर सोबत राहणाऱ्या दोघांची चौकशी का केली नाही? लगड यांना बोलण्याचीही पद्धतही नाही असंही चित्रा वाघ म्हणाल्या. संजय राठोडना वाचवण्यासाठी लगडसारखे लोक सर्वस्व पणाला लावत आहेत.
१२ ऑडिओ क्लिप्स काय सांगत आहेत? त्या ऑडिओ क्लिप्समध्ये आत्महत्येपासून परावृत्त कर हे सांगण्यापासून तिचा मृत्यू झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतचं संभाषण आहे. हे सगळं संभाषण अरूण राठोडच्या फोनवर होतं. अरूण राठोडचा फोन जप्त केला की नाही केला? १२ ऑडिओ क्लिप्समधे जो दुसरा आवाज आहे तो संजय राठोड यांचाच आहे असा दावा मी करते आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT