वादग्रस्त मतांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पायल विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याबद्दलचा एक वादग्रस्त व्हिडीओ पायलने पोस्ट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पायल रोहतगीसह व्हिडीओ तयार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, काँग्रेस आदींबद्दल पायल रोहतगीने खोटा व बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
बदनामीकारक व्हिडीओच्या माध्यमातून हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पायल रोहतगीने केला आहे, असं संगीता तिवारी यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. संगीता तिवारी यांच्या तक्रारीवरून पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT