मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील एक नामांकित विकासकाच्या नातेवाईकाच्या एका कार्यक्रमात हवेत गोळीबार करून डान्स करत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीडिओमध्ये कल्याण पूर्वमधील नामांकित उद्योजक संजय गायकवाड हे डान्स करताना दिसत आहे. तर त्यांचे नातेवाईक हवेत गोळीबार करताना दिसत आहे. सध्या कोळसेवाडी पोलिसांनी गायकवाड आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून तीन जणांना अटक केली आहे. तसेच नातेवाईकांकडे असलेल्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
८ कोटींची रोल्स रॉइस विकत घेणाऱ्या बांधकाम उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा
हा तोच प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड आहे. ज्याचाकडे 8 कोटींची रोल्स रॉयस कार आहे. ज्याने कार खरेदी केल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती. पण त्याचवेळी महावितरण कंपनीने 34 हजार वीजबिल न भरल्याने गायकवाड यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानंतर बिल्डरने वीजबिल भरले होते.
८ कोटींची रोल्स रॉइस विकत घेणाऱ्या बांधकाम व्यवसायिकावर वीज चोरीचा गुन्हा
काय होतं नेमकं प्रकरण?
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच 8 कोटींची रोल्स रॉइस ही अलिशान गाडी घेतल्यामुळे चर्चेत आले होते. परंतू काही दिवसांनी एका नकोशा कारणामुळे संजय गायकवाड यांचं नाव चर्चेत आलं होतं. महावितरणने संजय गायकवाड यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे स्थानिक अतिरीक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने संजय गायकवाड यांच्या बांधकाम ठिकाणांची पाहणी केली होती. यावेळी कोळसेवाडी परिसरात इमारतीच्या बांधकामावेळी वीजेचा गैरवापर केला जात असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर महावितरणने संजय गायकवाड यांना तात्काळ 34 हजार 840 रुपयांचं बील पाठवून 15 हजारांचा दंड ठोठावला होता.
तीन महिन्यांनंतरही गायकवाड यांनी बील न भरल्यामुळे अखेरीस महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सर्व रक्कम भरल्याची माहिती महावितरणने दिली होती. परंतू हा प्रकार माझी बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT