मुंबई: LPG Price Hike: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना मोठा झटका दिला आहे. कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची (commercial cylinder) किंमत तब्बल 43.5 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी ठिकाणचे पदार्थ आणखी महाग होऊ शकतात.
ADVERTISEMENT
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत ही 1693 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी याची किंमत 1650 रुपये होती. दरम्यान, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडर किंमतीत काहीही बदल झाल्याने सामन्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपये झाली आहे. पूर्वी ती 1693 रुपये होती.
कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत सर्वाधिक 1805.5 रुपये झाली आहे. पूर्वी याची किंमत ही 1770.5 रुपये होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार त्यामध्ये बदल करतात.
घरगुती वापरच्या LPG गॅसबाबत दिलासा
यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती, म्हणजे घरगुती एलपीजीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 885 रुपये एवढी झाली. तर दिल्लीत घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी सध्या 884.50 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला तरी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य जनतेसाठी ही थोडी फार दिलासा देणारी बाब आहे.
सीएनजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी सरकारने नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किंमतीत 62 टक्के वाढ जाहीर केली आहे. नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस (CNG Gas) तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचं चूल पेटवा आंदोलन, सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा
महागाई प्रचंड वाढली, सामान्य नागरिकांमध्ये नाराजी
दरम्यान, मागील वर्षभरात वाढणाऱ्या महागाईने सामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सिलेंडर गॅस, पेट्रोल यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहेच पण त्याशिवाय किराणा मालाच्या वस्तू आणि खाद्य तेल यांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकारबाबत प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT