मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह हा मुंब्रा येथील खाडीत आज आढळला आहे. या प्रकरणात आजच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केलं होतं. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ, तिथे असणारी दुसरी कार, मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटले? या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्याकडेच कसा आला? इतके सगळे योगायोग कसे काय? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. तसंच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा NIA कडे देण्यात यावा अशीही मागणी आता फडणवीस यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
या आरोपांवर तपास अधिकारी सचिन वाझे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसुख हिरेन हे ठाण्यात वास्तव्य करत होते. मी त्यांना ओळखत होतो, मी त्यांना बऱ्याचवेळा भेटलो आहे. मनसुख हिरेन यांनी एक तक्रार केली होती की काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मात्र यापेक्षा अधिक मला काहीही माहित नाही. मी त्यांना नजीकच्या काळात भेटलेलो नाही असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वाझे म्हणतात..
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार सापडली तेव्हा सर्वात आधी पोहचणारा मी नव्हतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गामदेवी हे त्या ठिकाणी सर्वात आधी पोहचले. त्यानंतर वाहतूक विभागाचे दोन अधिकारी पोहचले. त्यानंतर त्या विभागाचे डीसीपी अँटेलिया जवळ पोहचले. त्यानंतर मी गुन्हे शाखेच्या पथकासह तिथे पोहचलो.
मला हे कळलं होतं की मनसुख हिरेन यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती की काही पत्रकार आणि पोलीस अधिकारी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्यांची कार चोरीला गेली त्यावेळी किंवा त्याच्या एक दिवस आधी मी त्यांना भेटलो नाही. क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्यांनी माझी भेट घेतली ही माहिती चुकीची आहे. असंही वाझे यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT