मच्छिमार बांधव हे मासे पकडण्यासाठी आपल्या बोटी समुद्रात टाकत असतात. मासेमारीतून मिळणाऱ्या माशांवर त्यांची उपजिवीका असते. परंतू पालघरमधल्या काही मच्छिमारांचं नशीब घोळ माशाने बदलून टाकलंय. मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात १५७ घोळ मासे सापडले.त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लेडर) ह्याची विक्रीतून मच्छिमारांना सव्वा कोटीची रक्कम मिळाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांनी २८ ऑगस्ट रोजी आपली सुमद्रात टाकली. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे २० ते २५ नॉटिकल अंतरावर हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली. ही जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतीक्षेनंतर बोटीतील मच्छीमारांनी आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली. यावेळी जाळ्यामध्ये या मच्छिमारांना एकूण १५७ घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्यांचे नशीबच फळफळले.
सुमारे १२ ते २५ किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने सर्व मच्छिमार आनंदात होते. घोळ माश्याच्या पोटात असलेल्या भोत या प्रकाराला मोठी किंमत असून नर जातीच्या भोताला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळत असते. उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून या भोताची खरेदी केली जाते. या विशिष्ट जातीच्या व्यापाऱ्यांची व्यवसायात मक्तेदारी असून लिलावा द्वारे या भोताची खरेदी केली जाते. सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते.
सातपाटी मध्ये सर्वप्रथम शुक्रवारी या भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाल्यानंतर रविवारी मुरबे येथे १५ ते २० व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव पार पडला. यावेळी १ कोटी २५ लाखांची बोली लागल्याची माहिती समोर आली. घोळ माशाचे मास ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे कळते.
ADVERTISEMENT