कोल्हापूर हादरलं! हळद, कूंकू लावलेल्या अवस्थेत सापडला सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह

मुंबई तक

• 07:00 AM • 05 Oct 2021

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कागल तालुक्यातील लहान मुलाचं अपहरण करुन खून केल्याची घटनेला काही दिवस होत नाही, तोच आणखी एका सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मुलाच्या अंगावर हळद, कूंकू, गुलाल टाकलेला असल्यानं नरबळी असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. मुरगुड (जि. कोल्हापूर) येथे एका चिमुकल्याचं अपहरण खून […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कागल तालुक्यातील लहान मुलाचं अपहरण करुन खून केल्याची घटनेला काही दिवस होत नाही, तोच आणखी एका सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मुलाच्या अंगावर हळद, कूंकू, गुलाल टाकलेला असल्यानं नरबळी असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

मुरगुड (जि. कोल्हापूर) येथे एका चिमुकल्याचं अपहरण खून केल्यानंतर नरबळी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात सात वर्षाच्या बालकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

आरव केशव केशरे असं मयत बालकाचं नाव आहे. आरव दोन दिवसांपासून घरातून गायब होता. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्याबरोबर ग्रामस्थांनीही वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध सुरू केली होती. तर दुसरीकडे शाहूवाडी पोलिसांनी आरवच्या शोधासाठी पोलीस पथक पाठवली होती.

आरवचा शोध सुरू असतानाच मंगळवारी (5 ऑक्टोबर) सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे आढळून आला. आरवच्या अंगावर गुलाल, हळद आणि कूंकू टाकण्यात आलेलं होतं. संशयास्पद अवस्थेत आरवचा मृतदेह सापडला असून, नरबळी प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास शाहूवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

आरवच्या मृत्यूच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरवचा मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातीलच कागल तालुक्यात अशीच एक घटना घडली होती. आरोपी मारुती वैद्य याने मित्राच्याच वरद रवींद्र पाटील नाव असलेल्या मुलाचं अपहरण करून हत्या केली होती.

वरद १७ ऑगस्टपासून बेपत्ता होता. वरद आजोळी सावर्डे बुद्रुक येथे गेला होता. वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यापासून तो बेपत्ता होता. त्यानंतर सावर्डे बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह सापडला होता. त्याचाही नरबळीच्या प्रकारातून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

    follow whatsapp