भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कारवर झालेल्या हल्ला प्रकरणात मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे शनिवारी राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी शनिवारी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किरीट सोमय्यांना दुखापतही झाली.
ADVERTISEMENT
काय घडलं होतं शनिवारी?
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांची भेट घेऊन परत निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री १० वाजताच्या सुमारास सोमय्या जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या आणि दगड भिरकावले. यात सोमय्या जखमी झाले.
शुक्रवारी रात्रीच भाजपचे मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. मातोश्रीबाहेरून जात असताना कलानगर जंक्शन येथे मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती, त्या पाठोपाठ ही घटनाही घडली.
त्यानंतर या प्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वांद्रे पोलिसांनी हे प्रकरण खार पोलिसांकडे वर्ग केलं. त्यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणी तपास करून ही कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या विरूद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळतो आहे. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर संजय राऊत यांनी किरीट सोमय्याांवर विविध आरोप केले आहेत.
किरीट सोमय्यांना जिवे मारण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तर आज सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. पोलीस स्टेशनच्या आवारात किरीट सोमय्यांवर हल्ला कसा काय होतो? पोलिसांनी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला पण शिवसैनिकांवर गुन्हा का दाखल केला नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
आता या प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता वादाचे आणि आरोप प्रत्यारोपांचे किती अंक पाहायला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT