‘उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही,’ असं म्हणणारे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर शिंदे गटात सामील

मुंबई तक

30 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी शिवसेना सोडणार नाही, असं ठणकावून सांगणारे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना आपला योग्य सन्मान केला जाईल, असं सांगितलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी शिवसेना सोडणार नाही, असं ठणकावून सांगणारे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना आपला योग्य सन्मान केला जाईल, असं सांगितलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना शिंदे गटात गेल्याने त्याच फलित नेमकं काय मिळतं, हे पहावं लागेल.

हे वाचलं का?

आमदार ज्ञानराज चौगुले गायकवाडांना मानतात आपले गुरु

रवींद्र गायकवाड हे एकेकाळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी उस्मानाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम पाहिलं आहे. उमरगा तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. उमरगा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले ज्ञानराज चौगुले हे रवींद्र गायकवाड यांना आपले गुरु मानतात. चौगुले शिंदे गटात गेल्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं.

उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं म्हणाले होते गायकवाड

चौगुले यांनी गुवाहाटीतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये आपण गुरु रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुवाहाटीला आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे रवींद्र गायकवाड हे देखील शिंदे गटात जातात का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर गाईकवाड यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं याचर्चेवर पडदा पडला होता. नंतर अखेर रवींद्र गाईकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंचा हात धरला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला मिळणार बळ

दरम्यान रवींद्र गाईकवाड यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला आणखी बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील दोन आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे अगोदरच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे यापुढे आता सावंत, चौगुले, गायकवाड विरुद्ध खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि कैलास पाटील असा चित्र आगामी काळात दिसू शकतो. रवींद्र गायकवाड यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्र दिले जाऊ शकतात. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला जागा सुटल्यास ते लोकसभेचे उमेदवार देखील राहू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रवींद्र गायकवाड यांची राजकीय कारकीर्द

रवींद्र गाईकवाड हे उमरगा शहरातीलच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. वारकरी कुटुंबातून आल्याने अध्यात्म आणि वक्तृत्वावर त्यांची चांगली पकड होती. त्यामुळे शहरात त्यांचं नाव होतं. परिवाराला काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी जरी असली तरी ते पुढे शिवसेनेशी जोडले गेले. सुरुवातीला विधान सभा निवडणूक भाजप-सेनेची युती असल्याने कमळाच्या चिन्हावर लढले आणि हरले.

नंतर 1994 साली पहिल्यांदा आमदार झाले. 1999 साली पुन्हा पराभूत झाले. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने जिंकून आले. नंतर 2009 साली जिल्ह्यातील मातब्बर नेते पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लोकसभा लढवली आणि अवघ्या 4500 मतांनी पडले. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी पाटलांचा 2 लाख 27 हजार मतांनी पराभव केला. मात्र खासदारकीच्या कार्यकाळात नॉट रिचेबल आणि वादग्रस्त खासदार म्हणूनच त्यांची ओळख राहिली.

2019 सालापासून नाराज असल्याचं बोललं जात होतं

2019 सालच्या निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. दरम्यानच्या काळात तानाजी सावंत यांचं मातोश्रीवर चांगलं वजन होतं. त्याच वजनाच्या जोरावर गायकवाड ऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. तेंव्हापासून ते नाराज असल्याच्या बातम्या अधून-मधून येत होत्या. त्यांनी ओमराजेंच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्याचं देखील बोललं जातं.

वादग्रस्त खासदार म्हणून होती ओळख

रविंद्र गायकवाड हे वादग्रस्त खासदार म्हणून माध्यमात चर्चेत राहिले आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कर्मचाऱ्याच्या तोंडात जबरदस्तीने भाकरी कोंबल्याच्या प्रकरणादरम्यान वाद घालताना गायकवाड उपस्थित होते. महाराष्ट्र सदनच्या स्वयंपाकघरातील हा किस्सा देशातील आणि प्रामुख्याने राज्यातील माध्यमांमध्ये चांगलाच रंगला होता. तर, एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना रविंद्र गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्यास चपलेने मारले होते. त्यानंतर, गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेही वादग्रस्त खासदार म्हणून रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले होते.

    follow whatsapp