गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजेच येत्या बुधवारी आहे. याचदिवशी विविध सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे मागच्या दोन वर्षात पहिल्यांदाच धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल.
ADVERTISEMENT
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा होणार विराजमान
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश पुराणात दिलेल्या माहितीनुसार गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. त्या दिवशी बुधवार होता. या वर्षीही बुधवार आणि गणेश चतुर्थीचा योग जुळून आला आहे. त्यामुळे या वर्षीच्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्वही आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी का करत नाही चंद्रदर्शन?
पुराणात सांगितल्या गेलेल्या कथेनुसार एकदा गणपती बाप्पा मूषकावर स्वार होऊन जात होता. त्यावेळी तो घसरला. ते पाहून चंद्राला हसू आवरलं नाही. चंद्राने गणपती बाप्पाकडे पाहून जोरजोरात हसण्यास सुरूवात केली. ज्यानंतर बाप्पा रागवला. गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला दिला की आजपासून तुझ्याकडे कुणीही पाहणार नाही. हे झाल्यानंतर चंद्र घाबरला. चंद्राने बाप्पाची तपश्चर्या केली. त्यानंतर बाप्पा चंद्रावर प्रसन्न झाला. बाप्पाने चंद्राला उःशाप दिला तो असा होता की ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्यादिवशी जर कुणी तुझे तोंड पाहिले तर त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन त्याज्य मानलं गेलं आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन केलंच तर काय करावं?
गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्रदर्शन केल्यास चतुर्थीचं व्रत करावं त्यामुळे चोरीच्या खोट्या आळातून मुक्तता होते असंही सांगितलं गेलं आहे. एकदा श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्राकडे पाहिलं होतं त्यावेळी कृष्णावरही स्यामंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता.
गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त
अमृत योग- सकाळी ७ वाजून ५ मिनिटं ते ८ वाजून ४० मिनिटं
शुभ योग सकाळी १० वाजून १५ मिनिटं ते ११ वाजून ५० मिनिटं
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी बसवण्यात आलेल्या मूर्तीला काय अर्पण कराल?
गणेश चतुर्थीला घरी बसवण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तीला दुर्वा वाहिला जातात. २१ दुर्वांची एक जुडी असते. अशा २१ जुड्यांची माळ गणपतीला घालण्याची प्रथा आहे. मोदक हे गणपतीला प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी मोदकांचा नैविद्य दाखवावा. याच दिवशी बाप्पाला शेंदूरही वाहिला जातो. तसंच पूजा करणाऱ्या प्रत्येकाने शेंदूर कपाळाला लावण्याचीही प्रथा आहे.
ADVERTISEMENT