गणपती हा आपल्या सर्व देवांपैकी आराध्य देव म्हणून मानला गेला आहे. कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी पूजेचा मान मिळतो, तो आपल्या लाडक्या बाप्पालाच! भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला घरोघरी बाप्पा विराजमान होतात. यंदा कोरोनाचा काळ सरल्यानंतर पहिल्यांदाच थाटामाटात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचं सावट असल्यानं गणेश उत्सवासह सगळ्याच सण साधेपणाने साजरे केले गेले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहपूर्ण वातावरण आहे.
ADVERTISEMENT
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कशी कराल श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना?
३१ ऑगस्टच्या दिवशी सकाळच्या वेळात म्हणजेच सकाळी ७.३० ते ९ या वेळेत गणेश पूजन करणं हे शुभ असेल. त्यानंतरची वेळ आहे सकाळी ११. ५ ते दुपारी १.३० या वेळेतही गणेशाची प्रतिष्ठापना करू शकता.
काय आहे बाप्पाच्या पूजेचा विधी?
गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या जागी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवावा. त्या पाटावर थोडं पाणी शिंपडून तो शुद्ध करून घ्यावा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड अंथरावं आणि त्यावर अक्षता ठेवाव्यात. लाल कापड अंथरण्याआधी चौरंगावर किंवा पाटावर गंधाने स्वस्तिक काढावं. त्यानंतर गणपतीवर गंगाजल शिंपडून किंवा मंत्रोच्चार करून थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावं.
मूर्तीचा प्रतिष्ठापना करताना दोन्ही बाजूला एक एक सुपारी रिद्धी आणि सिद्धी म्हणून ठेवावी. गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात विड्याची पाने पाच किंवा सात ठेवून त्यावर एक नारळ ठेवावा. हातात अक्षता आणि फुलं घेऊन बाप्पाचं ध्यान करावं. त्यानंतर ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा. गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे (किमान एकदा) मूर्ती पाटावर बसवल्यानंतर त्याची विधीवत पूजा करावी, त्यानंतर आरती करावी. त्यानंतर नैवैद्य म्हणून मोदक किंवा पेढे दाखवावेत.
घरी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी?
उजव्या सोंडेची मूर्ती घरात आणू नये. डाव्या सोंडेचीच मूर्ती घरात आणावी. मूर्तीची उंची शक्यतो दोन फुटांपेक्षा जास्त नसावी. घरच्या गणेशाची मूर्ती ही शक्यतो शाडू मातीची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर पर्यावरणाला अपाय करणाऱ्या वस्तूंपासून केलेली मूर्ती आणू नये. मूर्ती पर्यावरण पूरक असावी.
ADVERTISEMENT