माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या जम्मू काश्मीर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला असून, जाता जाता त्यांनी काँग्रेसच्या आजच्या अवस्थेसाठी नेते राहुल गांधी यांच्यावर खापर फोडलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेले आणि काँग्रेसमधील G23 गटाचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनाम्यात सोनिया गांधींचं अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे.
काँग्रेसमधील दीर्घ कारकीर्दीला उजाळा गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली घालवलेल्या राजकीय घटना, घडामोडींच्या आठवणीही राजीनाम्यात सांगितल्या आहेत.
काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला राहुल गांधी जबाबदार -गुलाम नबी आझाद
सध्याच्या काँग्रेसच्या अवस्थेबद्दल गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसमध्ये अशी स्थिती निर्माण झालीये की, तिथून पुन्हा परतणं अवघड झालंय. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
राहुल गांधींचा उल्लेख करताना गुलाम नबी आझादांनी म्हटलंय की, काँग्रेसची आज अशी अवस्था झालीये कारण, मागील आठ वर्षात काँग्रेस नेतृत्वानं अशा व्यक्तीला पुढे केलं, जी कधीच गंभीर नव्हती.
“राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी” गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यातले दहा ठळक मुद्दे
राहुल गांधींनी अनुभवी नेत्यांना बाजूला केलं; गुलाम नबी आझादांनी सोनिया गांधी पाठवलेल्या राजीनाम्यात काय?
राहुल गांधी यांचं राजकारणातील पदार्पण आणि विशेषतः २०१३ मध्ये जेव्हा त्यांना काँग्रेस नेतृत्वाकडून (सोनिया गांधी) पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी (राहुल गांधी) पक्षातील सल्लामसलत करण्याची व्यवस्थाच नष्ट केली, असं गुलाम नबी आझादांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
काँग्रेसमधील सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं आणि ज्यांना अनुभव नाही आणि चापलुसी करणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमधील चर्चेत प्राधान्य दिलं जाऊ लागलं. हे राहुल गांधी यांच्याकडून केलं गेलं, असं आझाद यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींची ती कृती बालिशपणाची; गुलाम नबी आझादांची टीका
गुलाम नबी आझाद यांनी २०१३ मधील एका घटनेचं उदाहरण देत राहुल गांधींच्या बालिशपणामुळे २०१४ मध्ये यूपीएला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला, असं म्हटलं आहे. २०१३ मध्ये राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए-२ सरकारने केलेला एक अध्यादेश फाडला होता.
अध्यादेश फाडण्याची राहुल गांधींची कृती असमजूतदारपणाची होती. मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीनी मंजूरी दिलेला अध्यादेश फाडणं बालिशपणा होता, असं म्हणत गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं असून, अत्यंत जड अंतःकरणाने आपण राजीनामा देत असल्याचं नमूद केलं आहे.
ADVERTISEMENT