महाविकास आघाडी सरकार चांगलं चाललं होतं. ते गद्दारी करून पाडण्यात आल्यानंतर ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे अजून ठरायचं आहे. अशात महाराष्ट्राची अवहेलना आणि महापुरूषांचा अपमान केला जातो आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. महाविकास आघाडीची आज बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र तोडण्याचं काम सातत्याने सुरू आहे
शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आपण म्हणतो. तो महाराष्ट्र तोडण्याचं काम सातत्याने केलं जातं आहे. कर्नाटकचं सरकार सातत्यानं गावं ताब्यात घेणार असल्याची भाषा करतं आहे. सोलापूर म्हटल्यावर पंढरपूरचा विठोबाही ताब्यात घेणार का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? हा प्रश्न पडला आहे. राज्यपाल कुठूनही येतात आणि काहीही वक्तव्य करतात. राज्यपाल आहेत म्हणून त्यांचा मान ठेवावा लागतो आहे. मात्र हेच राज्यपाल छत्रपतींचा अपमान करत आहेत. ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाईंचा अपमान करत आहेत. नवे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना एकूण महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान छिन्नविछिन्न करायचं आहे. महाराष्ट्रातले उद्योग पळवले जात आहेत.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातले उद्योग पळवले
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे उद्योग पळवले गेले. आता मला भीती ही आहे की येत्या काही काळात कर्नाटकच्याही निवडणुका आहेत त्यावेळी खरोखर महाराष्ट्रातलीही गावं पळवणार का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत हे कळणार कधी? कर्नाटकमध्ये काही मंत्री जाणार असं ऐकलं होतं. त्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यावर त्यांचा दौरा रद्द झाला. एवढा नेभळट महाराष्ट्र आपण कुणीही कधीही पाहिलेला नाही.
नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही
नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही हे सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची बैठक झाली. आमच्या मित्र पक्षांसोबत अजितदादा, बाळासाहेब थोरात आणि माझं बोलणं झालं आहे. या सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. विधानसभेचं अधिवेशन १९ ला सुरू होतं आहे. त्याआधी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचाच नाही तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्या सगळ्यांना मी आमंत्रण देतो आहे की महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना दाखवून देऊ.
जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा आपण काढतो आहोत अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. जे भाजपमध्ये महाराष्ट्र प्रेमी आहेत ज्यांना महाराष्ट्राचा अपमान पटत नाही अशा सगळ्यांनी या मोर्चात यावं कारण राजकारण यात मला आणायचं नाही. त्यामुळे १७ डिसेंबरला भव्य असा मोर्चा आपण काढणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. राज्यपाल हटावो म्हणून हा मोर्चा आहे का? तर नाही ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला त्या सगळ्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे असंही महाराष्ट्र प्रेमींना मी सांगू इच्छितो. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना आपण ताकद दाखवून देऊ असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.
ADVERTISEMENT