मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरिमन पॉईंट भागात बाळासाहेब भवन नाव देत दुसरं शिवसेना भवन उभं केलं आहे. या भवनाचे फोटोही समोर आले आहेत. अशात या बाळासाहेब भवन या वास्तूमध्ये हिरव्या खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. बाळासाहेब भवन हे नाव सोनेरी अक्षरात भगव्या रंगाच्या पाटीवर दिमाखदारपणे लिहिण्यात आलं आहे. मात्र त्याचवेळी आत असणाऱ्या या खुर्च्या लक्ष वेधून घेत आहेत.
ADVERTISEMENT
२१ जूनला शिवसेनेत राजकीय भूकंप
२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांसह बाहेर पडले. ज्यानंतर शिवसेनेत भलामोठा राजकीय भूकंप झाला. त्यावेळी सत्तेवर असलेलं महाविकास आघाडी सरकार हे अवघ्या आठ दिवसात कोसळलं. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते सरकार कोसळलं. त्यानंतर ३० जूनला भाजपच्या पाठिंब्यावर एकनात शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडींच्या नंतर शिवसेनेत उभी फूट पडली.
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना काबीज करण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांनी दावा सांगितला. तसंच आम्हीच खरी शिवसेना आहोत असाही दावा केला. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. तर बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं. मशाल हे ठाकरे गटाचं चिन्ह आहे तर ढाल तलवार हे शिंदे गटाचं चिन्ह आहे.
ठाकरे गटातले १३ खासदारही शिंदे गटात
शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या बाजूने असलेले १३ खासदारही शिंदे गटात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ शिवसैनिक गजानन किर्तीकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली आहे का? असाही प्रश्न विचारला गेला. मात्र या प्रश्नाला संजय राऊत यांनी उत्तर देत शिवसेना महाराष्ट्रात एकच आणि ती आमची शिवसेना असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. अशात आता बाळासाहेब भवन उभं राहिलं आहे. या भवनात असलेल्या हिरव्या खुर्च्या मात्र लक्ष वेधून घेत आहेत.
ADVERTISEMENT