मनीष जोग, जळगाव :
ADVERTISEMENT
राज्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर भले भले राजकारणी लक्ष ठेऊन आहेत. यात गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी. आर. पाटील यांचंही नावं घ्यावं लागेल. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या कन्या भाविनी पाटील याही या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्या रिंगणात असून त्यांनी स्वतंत्र पॅनेल टाकून प्रचारही सुरु केला आहे.
चंद्रकांत पाटील हे मूळचे जळगावमधील रहिवासी होते. मात्र, १९८९ ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. पण त्यानंरही त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्यांचे बरेचसे नातेवाईक खान्देशात आहेत. त्यामुळे जळगावमध्ये त्यांचं कायम जाणं-येणं असतं. शिवाय त्यांच्या कन्या भाविनी पाटील यांचा विवाह मोहाडीतील रामभाऊ पाटील यांच्याशी झाला आहे. याच गावातून त्या वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवतं आहेत.
भाविनी पाटील यांचीही दुसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. गत निवडणुकीला त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र यंदा इथलं सरपंचपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं त्या सदस्य म्हणून रिंगणात उतरल्या आहे.
भाविनी पाटील काय म्हणाल्या?
याबाबत भाविनी पाटील म्हणाल्या, गेल्या पंचवार्षिकला माझ्या गावानं माझ्यावर प्रचंड विश्वास टाकून ९० टक्के मतदान केलं. पहिलं लोकनियुक्त सरपंच म्हणून मला निवडून दिलं. मात्र यंदा केवळ सरपंच पद नाही म्हणून थांबणं यातून माझा स्वार्थ दिसून आला असता. त्यामुळे मी सदस्य म्हणून निवडणुकीला उभी आहे. त्यासाठी स्वतंत्र पॅनेलही उभं केलं आहे.
गेल्या पंचवार्षिकला गावात मूलभूत सोयी-सुविधा आणि इतर बरीच कामं झाली आहेत. हीच काम आपला यंदाचा विजयही सुकर करतील, असा विश्वास भाविनी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच त्या म्हणाल्या, गुजरातमध्ये खेडी उत्तम पद्धतीने विकसित झाली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मोहाडी गावचाही विकास करायचा आहे. त्यासाठी ग्रामपंचायत हातात असणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT