काँग्रेसला मोठा धक्का ! नेतृत्वावर गंभीर आरोप करत हार्दिक पटेलचा पक्षाला रामराम

मुंबई तक

• 06:06 AM • 18 May 2022

काँग्रेस पक्षाला देशभरात लागलेली उतरती कळा हा सध्या राजकारणात चिंतेचा विषय मानला जात आहे. पक्षाच्या नेतृत्व आणि कार्यशैलीत बदल करण्यासाठी काँग्रेसचं एक चिंतन शिबीर नुकतच जयपूर येथे पार पडलं. ज्यात पक्ष संघटनेत काही महत्वाचे बदल करण्याबाबत एकमत झालं. परंतू अवघ्या काही दिवसांमध्येच काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का सहन करावा लागला आहे. युवा नेता हार्दिक पटेलने काँग्रेसच्या […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस पक्षाला देशभरात लागलेली उतरती कळा हा सध्या राजकारणात चिंतेचा विषय मानला जात आहे. पक्षाच्या नेतृत्व आणि कार्यशैलीत बदल करण्यासाठी काँग्रेसचं एक चिंतन शिबीर नुकतच जयपूर येथे पार पडलं. ज्यात पक्ष संघटनेत काही महत्वाचे बदल करण्याबाबत एकमत झालं. परंतू अवघ्या काही दिवसांमध्येच काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का सहन करावा लागला आहे. युवा नेता हार्दिक पटेलने काँग्रेसच्या आपल्या पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आहे.

हे वाचलं का?

पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावर गुजरातमध्ये रान पेटवलेल्या हार्दिक पटेलने काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करत हार्दिक पटेलने राष्ट्रीय राजकारणात सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. काँग्रेसचा राजीनामा देताना हार्दिक पटेलने एक पत्र लिहून पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.

अनेक प्रयत्न करुनही काँग्रेस पक्ष देश आणि समाजहिताच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे मी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं हार्दिकने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

भविष्यात आमचा विचार करेल असा पर्याय देशातील जनतेला हवा आहे अशा परिस्थितीत काँग्रेसचं राजकारण फक्त विरोधापुरतं मर्यादीत राहिल्याचं हार्दिकने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारचं अप्रत्यक्षरित्या कौतुक करताना हार्दिक पटेलने काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर असो, CAA-NRC चा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणं असो किंवा मग GST चा मुद्दा असो प्रदीर्घ काळापासून देशवासियांना यात काहीतरी समाधानकारक बाब हवी होती. परंतू काँग्रेसने यात फक्त बाधा आणण्याचं काम केलं. गुजरात असो किंवा मग पटेल समाजाचे प्रश्न असो काँग्रेसचे रणतिनी ही फक्त केंद्र सरकारला विरोध करायचा इतकीच मर्यादीत राहिली. देशातील जनतेला भविष्यासाठी एक सक्षम रोडमॅप तयार करुन देण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्यामुळे बहुतांश प्रत्येक राज्यात त्यांना लोकांनी नाकारलं असल्याचं हार्दिक पटलेने म्हटलं आहे.

आपल्या पत्रात हार्दिकने पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वावर गंभीर आरोप करताना नेते कोणत्याच मुद्द्यावर गंभीर नसल्याचं म्हटलं आहे. गुजरातमधील जनतेच्या समस्या जाणून घेण्याऐवजी काँग्रेस नेत्यांचं लक्ष त्यांच्या मोबाईलमध्येच जास्त असतं. ज्यावेळी देश संकटात होता आणि काँग्रेसची लोकांना गरज होती तेव्हा आपले नेते परदेशात होते. वरिष्ठ नेतृत्वाचा गुजरातप्रति आणि तिकडच्या लोकांविषयी असा दृष्टीकोन असेल तर राज्यातील जनता काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून का पाहील असा सवाल हार्दिकने विचारला आहे?

दिल्लीवरुन आलेल्या नेत्यांना चिकन सँडविच मिळतंय की नाही यामध्येच गुजरातचे बडे काँग्रेस नेते मश्गुल असतात. मी जेव्हा कधीही युवांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या मनात मला काँग्रेसविषयी राग दिसून आला. आज एकही युवा तरुण काँग्रेससोबत जोडून घेण्यास उत्सुक नाहीये. गुजरातमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीच जाणुनबुजून जनतेच्या मुद्द्यांची धार कमी केली आहे. वरिष्ठ नेत्यांचं अशा प्रकारे स्वतःला विकणं हा गुजरातच्या जनतेशी धोका असल्याचा आरोप हार्दिकने आपल्या पत्रातून केला आहे. त्यामुळे हार्दिक पटेलच्या राजीनाम्याचे गुजरात काँग्रेसमध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp