राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मुंबई तक

• 03:32 PM • 28 Mar 2021

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडते आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही लोकं निर्बंधांचं पालन करत नसल्यामुळे पुन्हा लॉकडाउनची वेळ आल्याचा सूर टास्क फोर्सच्या बैठकीत लागला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडते आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही लोकं निर्बंधांचं पालन करत नसल्यामुळे पुन्हा लॉकडाउनची वेळ आल्याचा सूर टास्क फोर्सच्या बैठकीत लागला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज राज्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलंय.

हे वाचलं का?

“सध्याच्या घडीला राज्यात दर दिवशी १० टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ होते आहे. ही वाढ खरंच चिंताजनक आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहिली तर आपल्याला रुग्णालयात बेड कमी पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे. याचसोबत जर कोरोनाचा स्ट्रेन बदलला आणि नवीन म्युटेशनचे रुग्ण सापडले तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार सुरु आहे. आपली वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लोकांना आता गांभीर्याने वागावंच लागेल. मास्क घातले नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावावंच लागेल.” राजेश टोपे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. आजही अनेक लोकं आपल्यात सौम्य लक्षणं आढळली तरीही डॉक्टरांकडे जात नाहीत, घरीच थांबतात. काही वेळाने परिस्थिती गंभीर होते आणि मग ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे आपल्यात सौम्य लक्षणं दिसून आली तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी बोलत असताना केलं.

उप-राजधानीला कोरोनाचा विळखा, रविवारी ५८ जणांचा मृत्यू

बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत- मृत्यूंची संख्या वाढू शकते

दरम्यान टास्ट फोर्सच्या बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. असं झाल्यास या सर्व सुविधा सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचं डॉ. व्यास यांनी निदर्शनास आणलं.

“सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन बेड्सपैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन बेड्सपैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.”

वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रीय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते. मात्र आता २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.

    follow whatsapp