मुंबई तक: केंद्रातले आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी त्यांच्या पत्रकार परीषदेमध्ये आज देशातील काही राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असल्याबाबत त्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. तसंच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी व्हॅक्सिनेशन वाढत नसल्याबाबत टीका देखील केली आहे. पण देशातला मृत्यूदर आजही कमी असणं ही दिलाशाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
यावेळी बोलताना भूषण म्हणाले देशात रुग्णांची संख्या वाढत असली तरी देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या तीन आठवड्यात तो 3 टक्क्यांवर आल्याची माहिती त्यांनी दिली. असं असलं तरी काही राज्यांमध्ये 16 ते 18 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यापैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. महाराष्ट्राबरोबर पंजाब, हरीयाणा चंदीगढ आणि तामिळनाडू या राज्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘थ्री टी’ वर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. ज्यानुसार राज्यांना आता ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवावे लागणार आहेत.
यावेळी बोलताना राजेश भूषण म्हणाले की राज्यात सप्टेंबर 2020 पर्यंत 97 हजार कोरोनाचे रुग्ण आढळत होते. 9 फेब्रुवारीनंतर ही संख्या वाढू लागली. 4 मार्चला संपूर्ण देशात 8 हजार रुग्ण आढळले होते. 16 मार्चला संपूर्ण देशात 28 हजार 903 रुण आढळले आहेत. त्यातील 60 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. सध्या देशात 16 राज्यातील 70 जिल्ह्यांमध्ये 150 टक्के पेक्षा जास्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळते. तर, 17 राज्यातील 55 जिल्ह्यात 100 ते 150 टक्के रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय.
पश्चिम आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये ही रुग्णवाढ झाल्याचे आढळत असल्याची माहिती भूषण यांनी दिली. ज्यामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. महाराष्ट्रात देशातील 60 टक्के अक्टिव्ह केसेस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये रुग्ण वाढत असले तरी टेस्टची संख्या वाढत नसल्याबाबतही त्यांनी यावेळी टीका केली. महाराष्ट्रात सध्या आरटीपीसीआर टेस्टचं प्रमाण 71 टक्के आहे.
रुग्णसंख्या ही आता टीअर टू आणि टीअर थ्री शहरांमध्ये वाढत असल्याने रेफ्रल आणि अम्ब्युलन्स सुविधा अधिक सज्ज करण्याची आवश्यकता असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचना दिल्या आहेत. कारण या शहरांमध्ये आरोग्य सुविधा दूर असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ शकते.
ADVERTISEMENT