भरत केसरकर, सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन प्रकरणाचा निकाल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने राखून ठेवला आहे. या संदर्भातील निकाल उद्या (9 फेब्रुवारी) दिला जाणार आहे. आज (8 फेब्रुवारी) सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यानंतर कोर्टाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवण्यात आला. त्यामुळे नितेश राणेंना जामीन होणार की नाही? हे उद्या निकालात स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उद्या सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी ओरोस जिल्हा न्यायालयात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला आहे.
आमदार नितेश राणे यांच्या जामिनाचा निर्णय वरिष्ठ न्यायालयात वर्ग करण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. सध्या न्या. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली.
शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनी संतोष परब हल्ला प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायालयासमोर झाली त्याच न्यायालयात सुनावणी घेण्याचा अर्ज सादर केला होता. मात्र, ही मागणी आज न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे न्या. रोटे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
आज न्यायालय 5.45 वाजेपर्यंत सुरू होतं. तोवर युक्तिवाद पूर्ण न झाल्याने आता कोर्ट या प्रकरणाचा निकाल उद्या सुनावणार आहे.
कोर्टात काय घडलं?
जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणेंच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत आणि सतीश मानशिंदे यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपूर्वी हल्ला झाला होता. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी त्यांची बाजू न्यायालयापुढं जोरदार मांडली. यावेळी एका क्षणी आरोपींचे वकील हे दादागिरी करत आहेत. असा गंभीर आरोप विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. त्यामुळे कोर्ट रुममधील वातावरण काही काळ तापलं होतं.
भाजप आमदार नितेश राणे आता कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते.
या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी नितेश राणे यांना अटक केली आहे. तर मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंनाही आता अडचणीत आले आहेत.
ADVERTISEMENT