वसई-विरार आणि नालासोपारा भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून या तिन्ही शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
ADVERTISEMENT
सातारा : कराडमध्ये अतिवृष्टी, अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत
सेंट्रल पार्क, व्हिवा कॉलेज, दिवनमान या भागांत पाणी साचल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे. दुपारनंतरही या भागात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे अनेक रहिवासी संकुलांमध्ये पाणी शिरलं. या साचलेल्या पाण्यामधून स्विगी, झोमॅटो या फूड डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाट काढून काम करावं लागत होतं.
दरम्यान वसईमध्ये सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे अर्नाळा राज्य महामार्गावरील नाळे गावाजवळ रस्त्याच्या लगत एक मोठं वडाचं झाड कोसळून पडलं. हे झाड ८० वर्ष जून होतं, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतू हे झाड कोसळून विजेच्या तारांवर पडल्यामुळे या भागातील लोकांना दिवसभर अंधारात काढावा लागला आहे. वाहतुकीचाही खोळंबा यामुळे झालेला पहायला मिळाला. वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी हे झाड कापण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान विरारमध्येही पुराच्या पाण्यात ३ म्हशी वाहून गेल्या आहेत. आज दुपारी ३ वाजता ही घटना घडली. स्थानिकांनी हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हा प्रकार लक्षात आला. दरम्यान अग्नीशमन दलाच्या जवानांनी यापैकी २ म्हशींना सुखरुप वाचवलं, एका म्हशीचा शोध मात्र सुरु आहे. दरम्यान या भागात पावसाचा जोर कायम राहिला तर वसई-विरार भागात हाहाकार माजण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT