महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरणात प्रतिसेकंद तब्बल 1 लाख 73 हजार 935 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे. बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात 58.51 टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात 66.75 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच धरणात अवघ्या अकरा तासात 8.25 टीएमसी पाण्याची आवक झाली असून महाबळेश्वर, नवजा, कोयना या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
ADVERTISEMENT
मागील अकरा तासात कोयना धरणात सरासरी 84 हजार 416 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर पहाटे पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत या एक तासात धरणातील पाण्याची आवक 1 लाख 54 हजार 9 क्युसेकपर्यंत पोचली आहे. त्यामुळे पहाटेपासून कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत दोन तासात धरणातील पाण्याची आवक 1 लाख 73 हजार 935 क्युसेकपर्यंत पोहोचली होती.
दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पायथा वीजगृहातून 20 मेगावॅट वीज निर्मितीनंतर प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सकाळी हे पाणी सोडले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातच आता कोयना धरणाचा पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने कृष्णा तसेच कोयना नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील 11 तासात कोयना येथे 347 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 427 तर महाबळेश्वरमध्ये तब्बल 424 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कराड ते चिपळूण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूचना
कोयना विभागातील कदमवाडी ते नेचल दरम्यान काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. दत्तधाम जवळ जास्त पाणी आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाल्याशिवाय प्रवास न करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
संगम माहुली गावातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने येथील असलेल्या महादेव मंदिराच्या पायथा आणि कैलास स्मशान भूमीच्या पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. सततच्या पावसामुळे नदीकिनारी पूरसदृश परस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने नदी नदीलागतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT