मुंबई आणि उपनगरांना काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने झोडपून काढलं आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे मुंबईच्या अनेक भागांची अक्षरशः तुंबई झालेला पहायला मिळाली. या पावसाचा फटका शनिवारी रात्री लोकल सेवेलाही बसलेला पहायला मिळाला. अनेक एक्स्प्रेस-मेल गाड्या रद्द करण्यात आल्या. कल्याण-मुंबई लोकल सेवाही बंद करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
भारतीय हवामान खात्याने पुढील ३ तास शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
दरम्यान काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे दादर, लालबाग, परळ, दक्षिण मुंबईतील महत्वाची ठिकाणं, भांडूप, चिंचपोकळी या भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह होती की रस्त्यांना अक्षरशः नदीचं रुप आलंय. अनेक चारचाकी वाहनंही या पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडली आहेत.
काही भागांमध्ये पावसाचा जोर इतका मोठा होता की लोकांच्या दुचाकी त्यात वाहून गेल्या आहेत. अंधेरी-कांदिवली भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. कांदिवलीत काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान मिठी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून महापालिकेने या नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT