अहमदाबाद : कोणताही प्रकल्प कोणत्याही राज्यात जाऊ शकतो. दुसऱ्या एखाद्या राज्यात मोठा प्रकल्प गेला म्हणून गुजरातवर अन्याय होतो का? अखेरीस हा प्रकल्प देशात लागणार आहे. देश उत्पादनात पुढे जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक मोठे प्रकल्प गेले आहे, असं म्हणतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच राज्याच राजकारण ढवळून काढणाऱ्या वेदांता-फॉक्सकॉन वादावार पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) अहमदाबाद येथे इंडिया टुडे ग्रुपच्यावतीने ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांना वेदांता-फॉक्सकॉनसह एअर बस टाटा आणि इतर प्रकल्प गुजरातला पळविले या महाविकास आघाडीने केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
अमित शाह म्हणाले, हे प्रकल्प महाराष्ट्राचे होते हे तुम्हाला कोणी सांगितलं. यावर आदित्य ठाकरे यांनी इंडिया टूडेच्या कॉनक्लेव्हमध्ये हा आरोप केला असल्याचं सांगितल्यानंतर अमित शहा म्हणाले, आदित्य ठाकरे कायमच खरंच बोलत असतात का? असा प्रतिप्रश्न केला.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
प्रत्येक प्रकल्प आणि गुंतवणूकदारांचा अभ्यास असतो. प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु करायचा, कोणत्या राज्यात काय स्कीम आहे? कोणत्या राज्याचं प्रशासन कसं आहे, तिथली भौगोलिक स्थिती कशी आहे? तिथली बंदरं कशी आहेत? तिथली रस्त्यांची स्थिती कशी आहे? या सर्वांचं आकलन करुन ठरतं असतं. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात गेले आहेत, मग गुजरात रडणार का? कोणी रडत नाही. प्रत्येक प्रकल्पाला कुठे ना कुठे जायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणापासून माध्यमांनी पण लांब रहावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
अनेक उद्योजक तुम्हाला किंवा पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी गुजरातला जातात आहेत का? या प्रश्नांवर उत्तर देताना शाह म्हणाले, या चर्चांना भक्कम आधार हवा. अशा प्रकराच्या चर्चा तंदुरुस्त स्पर्धात्मक वातावरणाला वेगळ्या प्रकारे पाहण्याची दृष्टी देतात. मला वाटतं अशा चर्चा देशाच्या हितामध्ये नाहीत. कोणताही प्रकल्प कोणत्याही राज्यात जाऊ शकतो. एखाद्या राज्यात मोठा प्रकल्प गेला म्हणून गुजरातवर अन्याय होतो का? अखेरीस हा प्रकल्प देशातच लागणार आहे. देश उत्पादनात पुढे जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक मोठे प्रकल्प गेले आहेत, असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT