गृहमंत्री अनिल देशमुखांचं ‘ते’ पत्र जसंच्या तसं…

मुंबई तक

• 02:43 AM • 21 Mar 2021

मुंबई: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी काल (21 मार्च) मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या याच आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे. यावेळी त्यांनी हे सगळे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी काल (21 मार्च) मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या याच आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे. यावेळी त्यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हणत परमबीर सिंग यांनाच टार्गेट केलं आहे. पाहा अनिल देशमुख यांच्या त्या प्रसिद्ध पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांचं पत्र जसंच्या तसं:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन श्री. परमबीर सिंग हे कसे खोट बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.

– सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचेवळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?

– आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉट्सअॅप chat वरुन काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरुन उत्तरे मिळवताना. श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरुन लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

– 18 मार्च रोजी मी कार्यक्रमात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरुपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरुन हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सअॅपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

– पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला.

– परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.

– स्वत:ला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

– सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

– विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करुन सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

– स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.

– मा. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपीची निष्पक्ष चौकशी करावी.

दरम्यान, आता गृहमंत्र्यांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp