लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह लहान मोठ्या उद्योजकांना तर बसलाच आहे. लग्न समारंभात महत्वाचा असणारा घोडा म्हणजे अश्वाला या प्राण्याला देखील याच्या झळा सोसाव्या लागतायेत . आर्थिक बजेट कोलमडल्याने घोड्यांचे पालन पोषण करणे अवघड बनलयं. लॉकडाऊनच्या संकटाने विविध व्यवसायिकांनी मोर्चा काढल्याचे आपण पाहिले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये चक्क घोडे व्यवसायिकांनी घोड्यांचा मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील घोडे व्यवसायिकांनी तहसील कार्यालयावर म्हणजे घोड्यांचा वाजत गाजत मोर्चा काढत अनोखे आंदोलन छेडलेय . इंदापूर तालुक्यात अशा पध्दतीने निघालेला हा पहिलाच मोर्चा आहे.
महाराष्ट्रातला Lockdown कायम राहणार आहे पण.. जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे?
कोरोना आणि लॉकडाऊनच्या आपत्कालीन कालावधीत घोडे व्यवसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला असून घोडे मालकांना त्यांची व घोड्यांची उपजिविका चालवणे अशक्य झाले आहे. या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवार रोजी इंदापूर नगरपरिषद ते तहसील कार्यालय या ठिकाणी हलगीच्या निनादात हा अनोखा मोर्चा काढण्यात आला. या अनोख्या मोर्चात इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागतील जवळपास १५ हून अधिक घोडे व्यवसायिक आपल्या घोड्यासह आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रत्येक घोड्याला महिना पाचशे किलो खाद्य मिळावे, त्यांना आरोग्य सेवा मोफत मिळावी, घोड्यांना शासकीय विमा योजनेमध्ये समाविष्ट करावे, घोडे व्यवसायिक यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, तालुकास्तरावर घोड्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलक व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केल्या आहेत.
कोरोना रूग्ण संख्या वाढल्याने महाराष्ट्रात 14 एप्रिल पासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लग्न समारंभ तर दोन तासातच आटपा असंही नव्या नियमांप्रमाणे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लग्नांमध्ये घोडे बोलावणं ही बाब लांबच राहिली आहे. अशात आता या सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक चणचण भासते आहे. घोड्यांना खाऊ घालणं आणि त्यांना पोसणं हे त्यांना परवडेनासं झालं आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.
ADVERTISEMENT