सांगोला: 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेली हॉटेलची उधारी द्या आणि मगच पुढं जा. असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने थेट माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची वाट अडवली.
ADVERTISEMENT
आज (16 जून) दुपारी पंचायत समितीच्या आवारातच माजी मंत्री सदाभाऊ खोत हॉटेल मालकाने अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. हा सगळ्या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक शिनगारे हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते. निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदरमोड करून उधारीने जेवळाणी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत असल्याचा आरोप अशोक शिनगारे यांनी केला आहे.
वारंवार उधारीची मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अशोक शिनगारे यांनी आज सदाभाऊ खोत यांना अडवून थेट आधी उधारी द्या आणि मग पुढे जा. असं म्हणत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाची समजूत काढून सुटका करून घेतली.
सदाभाऊ आज पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सांगोला पंचायत समितीमध्ये आले होते. सर्वांसमोर उधारीसाठी सदाभाऊ खोत यांना अडवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
Vidhan Parishad – भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत यांची शेवटल्या क्षणी माघार
सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत सदाभाऊ खोत यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पाहा खोत यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
‘पंचायत राज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यातून या ठिकाणी मी आलो आहे आणि सांगोला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावर येण्याचा प्रयत्न याठिकाणी केलेला आहे.’ असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
‘हा प्रकार अर्थातच निषेधार्थ तर आहेच. पोलीस स्थानकात आम्ही या संदर्भात तक्रार दिलेली आहे. एका आरोपीला ताब्यातही घेतलेलं आहे. परंतु अशा पद्धतीने सदाभाऊ खोताचा आवाज हा राष्ट्रवादीला कदापिही दाबता येणार नाही.’ असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
‘आम्ही शेवटपर्यंत या प्रस्थापितांविरोधात निश्चितपणाने अगदी निश्चयपूर्वक लढत राहू.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
ADVERTISEMENT