माझं सरकार कोसळलं तेव्हा मी अस्वस्थ झालो नव्हतो. सकाळी जाऊन मॅच पाहिली. असं शरद पवार म्हणाले होते. गुरूवारीच त्यांनी हे वक्तव्य केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
हे खरं आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे काही नवीन भाग नाही. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. मला आठवतंय की, १९७८-८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं गेलं. हे मला मुख्य सचिवांनी रात्री १२.३० वाजता सांगितलं. १२.३० वाजता तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातील सामान आवरायला घेतलं. सकाळी ७ वाजता मी दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्या दिवशी इग्लंडविरुद्ध भारताचा सामना होता. मी वानखेडे स्टेडियमवर सामना बघायला गेलो. क्रिकेटचा आनंद घेतला.
शरद पवारांनी हा किस्सा सांगितल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तेव्हा नेमकं काय घडलं होतं त्याची. आम्ही आता मुंबई तकच्या वाचकांना सांगणार आहोत की शरद पवारांनी प्रयोग करून स्थापलेलं हे सरकार कसं कोसळलं होतं. लोक माझे सांगाती या पुस्तकातच शरद पवारांनी हे सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे शरद पवारांनी या पुस्तकात?
जनता पक्षातल्या सर्वाधिक मोठ्या गटाच्या अर्थात भारतीय लोकदलाच्या पाठिंब्याच्या तोंडी आधारावर चरणसिंग यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापन करण्याची संधीही दिली. मात्र लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. चरणसिंग यांच्या सरकारमध्ये चव्हाणसाहेब आणि ब्रह्मानंद रेड्डीही सहभागी होते. इंदिरा गांधींनी चरण सिंग यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला होता. मात्र सभागृहात बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच त्यांनी पाठिंबा मागे घेतला. त्यामुळे चरणसिंग सरकार कोसळलं.
२२ डिसेंबर १९७९ ला लोकसभा बरखास्त झाली. जनता पक्षाच्या नेत्यांमधल्या सुंदोपसुंदीमुळे भारतीय प्रजेचा भ्रमनिरास झाला. जानेवारी १९८० मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत ३५४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून इंदिरा गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
‘ती’ अस्वस्थता नव्हती तर मग काय होतं? देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना खोचक सवाल
केंद्रातल्या या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटणं साहजिकच होतं. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं. नामांतरावरून मराठवाड्यात नुकत्याच दंगली झाल्या होत्या. दलितांवर हल्ले झाले होते. या पार्श्वभूमीवर देशाचे नवे गृहमंत्री ग्यानी झैलसिंग यांचा मला फोन आला आणि मला दिल्लीला भेटायला बोलावलं. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात झालेल्या अशांत परिस्थिीबाबत मला चर्चा करायची आहे असं मला त्यांनी सांगितलं.
विधीमंडाळचं अधिवेशन संपायला दोन दिवस बाकी आहेत ते झालं की मी पोहचतो असं मी त्यांना सांगितलं. ठरल्याप्रमाणे दिल्लीला गेलो. विमानतळावरच निरोप मिळाला की दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात जाऊ नका, थेट नॉर्थ ब्लॉकमध्ये जा. मी ग्यानी झैलसिंग यांच्या कार्यालयात पोहचलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की माझं तुमच्याकडे कोणतंच काम नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी तुम्हाला भेटू इच्छितात. मी बुचकळ्यात पडलो. मी म्हणालो की पंतप्रधान झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करायला जाणारच होतो. मात्र मी त्यांची वेळ घेतलेली नाही.
झैलसिंग यांनी मला सांगितलं की वेळ घेण्याची कोणतीही गरज नाही. मी थेट इंदिरा गांधी यांना भेटू शकतो. इंदिराजी २४ विलिंग्डन क्रिसेंट या बंगल्यात वास्तव्य करत असत. आम्ही तिथे पोहचलो. त्यांच्या कार्यालयात जाऊन स्थानापन्न झाल्यानंतर झैलसिंग म्हणाले मी निघतो. इंदिराजींना फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. एवढं बोलून ते निघून गेले. त्यानंतर इंदिराजी दोन-चार मिनिटातच तिथे पोहचल्या.
त्या आल्यावर पंतप्रधान झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं झालं. त्यानंतर त्या म्हणाल्या की डिस्पाईट ऑल ऑड्स यू आर मॅनेजिंग वेल. (प्रतिकूल परिस्थिती येऊनही तुम्ही राज्यकारभार चांगला सांभाळता आहात.) मी त्यांचा प्रश्न ऐकून थोडा दुविधेत पडलो. मग त्यांचा सरळ प्रश्न आला आता पुढे काय? मी म्हणालो की जसं आत्ता सुरू आहे तसंच मार्गक्रमण करणार. त्यावर त्या म्हणाल्या की तुमच्यात एक दोष आहे. वरिष्ठांची साथ तुम्ही सोडत नाही. त्यांचा रोख थेट यशवंत राव चव्हाणांकडे होता.
त्यानंतरचं त्यांचं वाक्य आणखी थेट होतं. त्या म्हणाल्या की आज काँग्रेस विचारसरणीच्या तरूण पिढीने एकत्र येऊन काम करायला हवं. त्यावेळी काँग्रेसच्या युवकांचं नेतृत्व संजय गांधी यांच्याकडे होतं. त्यामुळे मी त्यांना सरळच विचारलं की, तुम्ही संजय गांधींबाबत बोलत आहात का? त्यावर इंदिराजी प्रतिप्रश्न विचारत म्हणाल्या का नाही? तुम्ही तरूणांनी एकत्र येऊन देशाचं भवितव्य घडवायला हवं. आम्ही किती दिवस ही जबाबदारी उचलणार?
त्यांचा सूर लक्षात घेऊन मी म्हणालो की आम्ही कशी जबाबदारी घेणार? तुमच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले आहेत ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाणसाहेब पक्षापेक्षा त्यांच्या व्यक्तीगत बळावर निवडून आले आहेत, असं म्हणणं योग्य ठरेल.
यानंतर इंदिरा गांधी म्हणाल्या की निवडणूक निकाल अलहिदा. मागच्या निवडणुकीत संजय आणि मी दोघंही पराभूत झालो होतो. पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला होता. पण आज आम्ही पुन्हा सत्तेत आहोत. निवडणुका येत-जात राहतात. यश-अपयशही असतं. तो काही मुद्दा नाही. तुम्ही ठरवलं तर तरूण नेतृत्वाला पाठबळ देऊ शकता. देशाचं प्रशासन तुम्ही चालवू शकता.
यावर मी पुन्हा त्यांनी म्हणाली, तुम्ही माझ्या क्षमतेविषयी विश्वास प्रकट केल्याबद्दल मी आभारी आहे. त्यावर त्या झटकन म्हणाल्या की मला तुमच्या कर्तृत्वाबाबत खात्री आहे. त्यांच्या या विधानावर, मग तुम्हीच मला पाठिंबा का देत नाही असं मी म्हणालो. त्या मोकळेपणाने हसल्या. आमची चर्चा तिथेच संपली.
‘माझं सरकार कोसळलं त्यादिवशी मॅच बघायला गेलो होतो’; पवारांचं फडणवीसांच्या वर्मावर बोटं
मी मुंबईत परतलो. तो शनिवार होता. माझे उद्योगपती माधवराव आपटे, त्यांच्या पत्नी, श्री आणि सौ नसली वाडिया, श्री आणि सौ अरूण, डहाणूकर अशा स्नेह्यांसोबत आरो कॉलनीत दिवसभऱ गप्पा गोष्टी झाल्या. तो दिवस खग्रास सूर्यग्रहणाचा होता. त्यामुळे ग्रहण कुणाला लागणार यावरही आमच्यात चर्चा झाली होती. रात्री बाराच्या सुमारास राज्याचे मुख्य सचिव एल. एस. लुल्ला माझ्याकडे आले होते. पुलोदचं सरकार बरखास्त झाल्याचा आदेश त्यांनी मला वाचून दाखवला. इंदिराजी आणि मी आम्ही भेटल्यानंतर ४८ तासात हा निर्णय आला होता. नवं नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रस्ताव मी फेटाळला होता. मला एक संधी देऊन बघण्याची त्यांची इच्छा होती, असं म्हणता येईल. ही संधी मला घ्यायची नव्हती हेही तितकंच खरं.
सरकार बरखास्तीमुळे साहजिक मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार झालो. मुख्यमंत्रिपदी नसताना सरकारी निवासस्थानात राहणं माझ्या स्वभावात नव्हतं. माझ्या आयुष्यात एक पथ्य कायम पाळत आलो आहे. ज्या ज्या वेळी माझी मंत्रिपदं गेली त्या त्यावेळी मी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत सरकारी निवासस्थान सोडून दिलं आहे. माझ्या सगळ्या उद्योगपती मित्रांना निर्णय कळला. त्यांनी प्रतिभाने आणि मी मिळून सामान आवरलं. माहेश्वरी मॅन्शनमध्ये राहायला गेलो. दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची टेस्ट मॅच होती माझ्याकडे जुनी फियाट होती. सरकारी गाडी गेली होती. स्वतःच ड्रायव्हिग करत माझ्या फियाटमधून आम्ही दोघं स्टेडियमवर गेलो. तिथे मॅच पाहिली, असं शरद पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT