महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. शिदेंनी भाजपसोबत सरकारही स्थापन केलं. आता त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. महाराष्ट्रात भाजपचं सरकार परत आलं. पण, दुसरीकडे दोनच वर्षात बिहारचं सरकार भाजपच्या हातातून गेलं. बिहारमध्ये महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती असंही बोललं जातं. एकनाथ शिंदेंनी जशी सेनेत फूट पाडली, तशी बिहारमधल्या नितीश कुमारांच्या पक्षात फूट पाडणार व्यक्ती कोण होती? बिहारमधले एकनाथ शिंदे कोण होते? त्यांचा प्लॅन नितीश कुमारांनी कसा पलटवला? हे आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
राम चंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रात कसा जमवला आपला जम?
महाराष्ट्रात भाजपसोबत स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्याच दिवशी भाजपला बिहारमध्ये मोठा धक्का बसला. कारण, नितीश कुमारांनी भाजपसोबत युती तोडली आणि बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. पण, बिहारच्या या सत्तानाट्यात एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे राम चंद्र प्रताप सिंह म्हणजेच RCP सिंह. सिंह यांचा पक्षावर इतका प्रभाव होता की नितीश कुमार यांनी त्यांना दोनवेळा राज्यसभेत पाठवलं. इतकंच नाहीतर त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं होतं. ते पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले होते. त्यानंतर सिंह केंद्रात पूर्णपणे सेट झाले होते.
इथूनच आरसीपी आणि नितीश यांच्यामध्ये ठिणगी पडल्याची चर्चा आहे. भाजपनं सिंह यांना केंद्रात मंत्रिपद दिलं होतं. पण, त्याला नितीश कुमार यांचा विरोध होता असंही बोललं जातं. आरसीपी सिंह काही दिवसांपूर्वी नालंदा येथे गेले त्यावेळी ‘हमारा मुख्यमंत्री कैसा हो, आरसीपी जैसा हो’ अशा घोषणा ऐकायला मिळाल्या. त्यानंतर नितीश कुमारच पक्षाचे नेते आहेत असं पक्ष नेतृत्वाला सांगावं लागलं होतं. तसेच आरसीपी यांची भाजपसोबत जवळीकही वाढली होती. त्यामुळे आरसीपी आपल्यासोबत काही आमदार घेऊन जाऊ शकतात आणि महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप बिहारमध्येही होऊ शकतो, अशी भीती नितीश कुमारांना होती. त्यामुळे नितीश कुमारांनी सावधं पावलं टाकली आणि आरसीपी यांची ताकद कमी करायला सुरुवात केली.
आरसीपी सिंह यांचा गेम कसा केला?
आरसीपी हे जेडीयूचे एकनाथ शिंदे होण्यापूर्वी नितीश कुमारांनी ऑपरेशन आरसीपी सुरू केलं. आधी त्यांना राज्यसभेचं तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी झारखंडचे खिरू महतो यांना राज्यसभा खासदार बनवलं. त्यानंतर सिंह यांच्याकडून पटना इथलं निवासस्थानही काढून घेतलं. त्यांना पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितलं नाही. त्याऐवजी सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना नोटीस जारी करत त्यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांना दूर करण्याचा प्रयत्न नितीश कुमारांनी केला.
एवढं सगळं झाल्यानंतर सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यापूर्वीही सिंह यांच्या जवळच्या चार महत्वाच्या नेत्यांना नितीश कुमार यांनी निलंबित केलं होतं. दोनच दिवसात नितीश कुमारांनी भाजपसोबत युती तोडली. अशारितीनं नितीश कुमारांनी आरसीपी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. जर नितीश कुमारांना हे केलं नसतं तर त्यांना एकनाथ शिंदेंसारख्या बंडाचा सामना करावा लागला असता, असंही बोललं जातं.
ADVERTISEMENT