मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने येस बँकेचे सह-संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूरचा गेल्या महिन्यात जामीन अर्ज फेटाळला होता. याचाच तपशील आता सार्वजनिक करण्यात आला आहे. हा जामीन नाकारताना कोर्टाने असं म्हटलं आहे की, ‘हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यात अर्जदाराचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. ही गोष्ट निकालात निघाली आहे की, जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपाचे स्वरूप आणि त्याच्या समर्थनार्थ पुरावे लक्षात घेतले पाहिजे. तसेच सार्वजनिक निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याकडे गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे.’ कोर्टाने पुढे असंही म्हटले आहे की, ‘येस बँकेत असलेले पैसे हे सार्वजनिक पैसे आहेत याबाबत काहीही वाद असू शकत नाही.’
ADVERTISEMENT
राणा कपूर यांचा जामीन अर्ज फेटाळताना कोर्ट नेमकं काय म्हणालं?
न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, खालच्या कोर्टाने पूर्वी जामीन याचिका फेटाळून लावली होती. जी योग्यच आहे. न्यायमूर्ती नाईक म्हणाले, “खालच्या कोर्टाने नोंदविलेल्या निरिक्षणापासून दूर जाण्याचे मला कोणतेही असे ठोस कारण सापडलेले नाही. येस बँकेचे एमडी/सीईओ म्हणून अर्जदाराने आपल्या आणि त्याच्या कुटुंबीयांना अयोग्य आर्थिक फायदा मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर केला आहे. अर्जदार (कपूर) आणि त्याच्या कुटुंबाने बराच आर्थिक फायदा करुन घेतला आहे. साक्षीदारांच्या जबाबावरुन आरोपींची कार्यपद्धती कशी होती हे समोर येतं. या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, येस बँकेने नुकसान भरपाई न देताही संस्थांना कर्ज वाढविले. तसेच या संस्थांनी कर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांकडे असलेल्या कंपनीला कर्ज दिले. दरम्यान, तपासात असंही उघडकीस आलं आहे की, भारत आणि परदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला गेला आहे.”
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राणा कपूर यांना आणखी एका मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक केली होती. त्याचप्रकरणी हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. हे प्रकरण पीएमसी बँकेतील 4300 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी जोडलेलं आहे. दरम्यान, याआधी राणा कपूरला वैयक्तिक लाभाचा विचार करुन मंजूर केलेल्या कर्जाप्रकरणी ईडीने अटक केली होती. याच कर्जाचा परतावा न झाल्याने येस बँकेवर आर्थिक संकट ओढावलं होतं. यावेळी स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली काही बँकांनी गुंतवणूक करुन येस बँक ऐनकेन प्रकारी वाचवली. पण यावेळी बँकेच्या मॅनेजमेंटमधून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची हकालपट्टी करण्यात आली होती.
दरम्यान, येस बँक घोटाळा प्रकरणी ईडीने आतापर्यंत राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल २२०० कोटींची संपत्ती जप्त केलेली आहे.
ADVERTISEMENT