ADVERTISEMENT
राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमातच नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसलं.
राज्याचे गृह राज्यमंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
दौऱ्यादरम्यान शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.
मंगरुळपीर शहरात शिवसेनेच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं.
या कार्यक्रम आयोजित करताना कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आले.
ब्लँकेट घेण्यासाठी गरजूंची मोठी झुंबड उडाली. महिला आणि लहान मुलंही मोठ्या संख्येनं आले होते.
सरकारकडून वारंवार गर्दी न करण्याचं तसंच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन न करण्याचं आवाहन केलं जात असताना सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमातच कोरोना नियमांचा फज्जा उडाला.
गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीबद्दल प्रश्न उपस्थित होतं आहे.
सध्या वाशिम जिल्ह्यात दररोज 150 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळाही ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT