मी लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही असं वक्तव्यही पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मुंबईत त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधत असताना हे वाक्य उच्चारलं आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एवढंच नाही तर मी कुणाचेही राजीनामे स्वीकारणार नाही असं म्हणत त्यांनी हे सगळे राजीनामे फेटाळून लावले. पंकजा मुंडे यांनी वरळी या ठिकाणी पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक आणि सडेतोड भूमिका स्पष्ट केलं. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
होय मी केंद्रातलं मंत्रिपद नाकारलं
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारलं होतं. आता मी पद मागेन का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. कोणताही निर्णय घ्यायचा असले तर त्याची योग्य वेळ असते. अविचाराने कोणताही निर्णय घ्यायचा का? मंत्रिपदासाठी प्रीतमताईंच्या नावाची चर्चा असताना आणि त्या लायक असतानाही त्यांना पद मिळालं नाही. पण डॉ. कराडांना मिळालं. माझं वय 42 आहे आणि कराड यांचं वय 65 आहे. वयाच्या 65 व्या वर्षी मंत्रिपद मिळालेल्या व्यक्तीचा मी अपमान करायचा का? हे माझे संस्कार आहेत का? मी त्यांच्या पदाला का अपमानित करू? असे प्रश्नही त्यांनी विचारले.
पाहा आपल्या भाषणात पंकजा मुंडे नेमकं काय-काय म्हणाल्या:
तुमचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, मुंडे साहेबांनी खस्ता खाऊन वंचितांना संधी देण्याचं काम केलं. राजकारणात आणण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. परळीची आमदार म्हणून मला त्यांनी राजकारणात आणलं, प्रस्थापितांसोबत त्यांनी युद्ध केलं. म्हणून मला त्यांनी राजकारणात संधी दिली. माझे घरचे ऐशोआरामात राहणार असं चालणार नाही.
मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही. प्रीतम मुंडे हा माझा परिवार नाही. तर साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता माझा हा माझा परिवार आहे.
माझं भांडण नियतीशी, नियतीने आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला. संघर्षयात्रेत असताना कोणाचं नेतृत्व येणार हे मला माहिती होतं. राज्यात भाजपची सत्ता आली पाहिजे हे मुंडे यांचं स्वप्न होतं. मी लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही.
तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कसं जगू, आमदारकीला मी हरले याचं मला दुःख नाही. अनेकांना माझ्या नावावर लोकांनी निवडून दिलं आहे.
आम्ही कधीच कोणाच्या समोर काहीही मागितलं नाही. मला दिल्लीत कोणीही झापलं नाही, मोदींनी सन्मानपूर्वक वागणूक दिली. नड्डा साहेबांनी विश्वास दाखवला, तुम्ही कार्यकर्त्यांची समजून काढा असंही त्यांनी मला सांगितलं.
ADVERTISEMENT